Pune Rain: खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
Pune Rain : पुणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

Pune Rain : पश्चिम राजस्थानातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Pune Rain)
पुणे शहरात रविवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, हडपसर, लोहगाव, कोथरूड, शिवाजीनगर, मगरपट्टा, हवेली आणि चिंचवड या भागांत पावसाच्या संततधार सरी पडत आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर इतका आहे की, रस्त्यांवर पाणी साचले, अनेक झाडे कोसळली आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परिणामी पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हडपसर परिसरातील बहुतेक शाळांनी आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग
सततच्या पावसामुळे खडकवासला धरण (Khadakwasla dam) साखळीतील पाणीसाठा वाढला असून, सकाळी 10 वाजल्यापासून मुठा नदीच्या पात्रात 14,547 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यासोबतच वरसगाव आणि पानशेत धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भिडे पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
थेऊर, धायरी, इंदापूरला घरात पाणी, लोकांची सुटका
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील सखल भागांना बसला आहे. थेऊरमध्ये ५० घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. एनडीआरएफच्या जवानांनी सुमारे ५० ते ६० नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. इंदापूर आणि धायरी येथेही पाणी घरात घुसल्यामुळे जनतेला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
वाहतूक ठप्प
पुणे-सोलापूर रोडवरील लोणी आणि वाकवस्ती परिसरात अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. काही घरांतही पाणी घुसल्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून शेतकरी वर्ग अधिक चिंतेत आहे.
शेतीचे मोठे नुकसान
शिरूरसह इतर भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने शेती तळ्यात रूपांतरित झाली आहे. नुकत्याच भरभरून आलेल्या पावसामुळे आठवड्याभरानंतर पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहेत. इंदापूर तालुक्यातील काझड येथे जोड कालवा फुटल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी गेलं आहे. बारामती परिसरातही रात्री पाऊस झाला होता.
आणखी वाचा
























