Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघातानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवार म्हणाले...
Pune Porsche Car Accident: पुणे अपघातावरुन राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
Pune Porsche Car Accident: पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal Arrest) यांना क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आता अल्पवयीन मुलगा आणि आई शिवानी अग्रवाल यांची एकत्रित चौकशी करणार आहेत. पुणे अपघातावरुन राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीका करण्यात आली. यावर आता अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
पुणे कार अपघात प्रकरणाबाबत बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला होता. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी अनेक कामांसाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना नेहमी फोन करत असतो. मात्र याप्रकरणी मी फोन केला नाही. जर मी पोलीस आयुक्तांना फोन केला असता, तर तुम्हाला बोललो असतो ना... मात्र मी त्यांना फोन केला नाही. मी जर आयुक्तांना फोन केलाच असता तर, पुण्यात सदर प्रकार घडलेला आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, असं सांगितलं असतं. कारण दोषींवर कारवाई करा हे सांगण, लोकप्रतिनिधींचं काम आहे, असं अजित पवार म्हणाले.
View this post on Instagram
सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही- अजित पवार
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत आहेत. आम्ही सारखेसारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही म्हणजे याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय, असे अजिबात नाही. विरोधक याप्रकरणात काय आरोप करतायत, हा त्यांचा अधिकार आहे. पण ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजितदादांनी सुनील टिंगरेंची मांडली बाजू-
स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे शंकेने बघितले जातंय, असं पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, चौकशी करु द्या ना, मी पण बारामतीचा 32 वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धाऊन गेले होते. तसेच या घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यामुळे सुनील टिंगरे त्या ठिकाणी गेला आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले होते, अशी जूनी आठवण सांगत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची बाजू मांडली.