Sharad Pawar: 'या पक्षांनीही मविआसोबत यावं...', विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पुढचा प्लॅन काय?
Sharad Pawar: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज्यातील या पक्षांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं आहे.
पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली आहे. सर्व छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्रिय येऊन लढण्याचं आवाहन नेत्यांकडून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांसोबत डावे पक्ष आणि इतर पक्षांनी एकत्रित यावं, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत 27 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील या तीन पक्षांसोबत डावे पक्ष आणि इतर पक्षांनी एकत्रित यावे, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज(शुक्रवारी) पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. लवकरात लवकर मतदार संघाचे निर्णय द्या. लोकांसमोर पर्याय द्या, अशी अपेक्षा आहे, असंही यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.
आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणालाही इंटरेस्ट नाही
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मी माझ्या पक्षापुरतं सीमित बोलतो. आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्रीपदात इंट्रेस्ट नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे. सत्तेत परिवर्तन करून राज्यातील जनतेला उत्तम शासन द्यावं, हा आमचा प्रयत्न आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीशी MIM ची सकारात्मक चर्चा
महाविकास आघाडीला एकत्र लढण्यासंदर्भात प्रस्ताव दिला असून मविआ सकारात्मक असल्याचा दावा इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर जायला तयार असून या बाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, पुन्हा एकटा लढल्यानंतर पुन्हा बी टीम म्हणून बोट दाखवू नका, असा इशाराही जलील (Imtiyaz Jaleel) यांनी मविआच्या नेत्यांना दिला आहे.
इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी बोलताना सांगितलं की, "महाविकास आघाडीला आम्ही एक प्रस्ताव दिला आहे. आपल्याला राज्यात भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार नको असतील, तर मतांचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. आज मी निवडणूक तुमच्यासोबत लढायला तयार आहे. तुम्ही जर मला तुमच्यासोबत नाही घेतलं आणि उद्या निवडणूक एकट्यानं लढलो, तर माझ्याकडे बोट दाखवू नका. तुमच्यामुळे आम्ही पडलो, तुम्ही याची बी टीम आहे, सी टीम आहे. मी स्पष्टपणे सांगतो, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुम्ही नसाल घेत तर, मी एकटा चलो रेच्या भूमिकेत असेल. पण समोरून मला सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं, चर्चा होण्याची शक्यता वाटत आहे."