पुण्यात 'या' वेळेत पुन्हा नाईट कर्फ्यु, शाळा, महाविद्यालयांबाबतही मोठा निर्णय
Pune Lockdown : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
![पुण्यात 'या' वेळेत पुन्हा नाईट कर्फ्यु, शाळा, महाविद्यालयांबाबतही मोठा निर्णय Pune night curfew 11 pm to 6 am till Corona crisis alert Pune College Closing Decision close schools, colleges schools February 28 पुण्यात 'या' वेळेत पुन्हा नाईट कर्फ्यु, शाळा, महाविद्यालयांबाबतही मोठा निर्णय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/19234415/Pune-Curfew.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Lockdown : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही लग्नाला परवानगी नाही, असंही सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केली जातील. उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.
नियमांचे पालन करुन अभ्यासिका सुरु राहणार !
शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे.
'लॉकडाऊन' नाही, पण मायक्रो कंटेन्मेंट झोनचा विचार !
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार नाही. मात्र मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे.
CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई
पुण्यात काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. नुकतंच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळं जनमानसात संभ्रमाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली 'पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन' अशा आशयाचा एका चॅनेलचा जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केला आहे. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे BMC अलर्ट मोडवर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. ज्यात मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 650 जणांवर महापालिकेकडून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अॅण्ड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. यात सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही कॅफे अॅण्ड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
धोका वाढला! महाराष्ट्रामागोमाग देशातही कोरोनाचा फैलाव; 5 राज्यांमध्ये अलर्ट
राज्यात अमरावतीत सर्वाधिक रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा 1055 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 28,815 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन आणि स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या. रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांसाठी लॉकडाऊन सुरू झालेला आहे. आता याला अमरावतीकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)