Pune Hoarding collapse : पुण्यातील चौक म्हणजे मृत्यूला आमंत्रण; शहरात अनाधिकृत होर्डिंगचा विळखा
पिंपरी चिंचवडमधील होर्डिंगकोसळले. या दुर्घटनेत पाच जण दगावले आणि चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. ते नव्यानं कारवाईला सुरुवात करणार आहे.
Pune Hording collapse : पिंपरी चिंचवडमधील होर्डिंग किवळ्यात कोसळले. या दुर्घटनेत पाच जण दगावले आणि चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. ते नव्यानं कारवाईला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या फलक धोरणाची यापुढील काळात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे शहरात 2485 अधिकृत फलक आहेत. तर एकूण 2629 अनधिकृत होर्डिंग होते. त्यापैकी आत्तापर्यंत 950 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केलेले आहेत. मात्र अद्याप ही 1679 अनधिकृत होर्डिंग शहरभर आहेत. या उर्वरित अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी आजपासून दहा पथकं शहरभर तैनात करण्यात येत आहेत. मालकांना होर्डिंगचे 15 दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे, जर इमारतीवर होर्डिंग असेल तर इमारतीसह स्ट्रक्चरल ऑडिट करायचं आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार यंदापासून विमा काढणं बंधनकारक असणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात होर्डिंगची सद्यस्थिती
पिंपरी चिंचवड शहरात एकूण 1407 जाहिरात होर्डिंग आहेत. वर्षभरात 127 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले आहेत. सध्या 434 अनधिकृत होर्डिंग असून त्यांच्याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या व्यतिरिक्त शहरात अनधिकृत होर्डिंग नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र नव्यानं पुन्हा सर्वेक्षण केलं जाणार आहे.
पालिकेचं दुर्लक्ष
रावेत परिसरात अनधिकृत फलकांचा सुळसुळाट आहे, ते होर्डिंग जमीनदोस्त करावे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे पाच जणांचा यात जीव गेला. त्यामुळं संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
जाहिरातदारांची कोर्टात धाव
महापालिकेकडे 2021-22 मध्ये 434 अर्जदारांनी होर्डिंग उभारण्याची परवानगी मागितली होती. त्यासंदर्भात प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली होती. मात्र त्याच काळात राज्य सरकारचं फलक धोरण जाहीर झालं. त्यामुळे अर्जदारांना परवानगी देणार नाही, असं सांगितलं होतं. या भूमिकेनंतर सगळ्या जाहिरात दारांनी एकत्र येत पालिकेच्या भूमिकेविरोधात एकवटले होते आणि त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्थगिती दिली होती.
पाच जणांचा मृत्यू
शोभा टाक, वर्षा केदारी, भारती मंचक, अनिता रॉय, रामअवध आत्मज अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत. तर विशाल यादव, रहमद अन्सारी, रिंकी रॉय ही जखमींची नावं आहे. या सगळ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणं आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचं पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलं आहे.