(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Shelke On Rohit Pawar : तेव्हा रोहित पवार भाजप सोबत जाण्यास आग्रही होते; आमदार सुनिल शेळकेंचा गौप्यस्फोट
Sunil Shelke On Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केला आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी (rohit pawar) भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागा घेऊ पाहतायेत, असा गौप्यस्फोट अजित पवारांचे (ajit pawar) कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (Sunil shelke) केला. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 22 जून 2022 चा तो दिवस होता. त्या दिवशी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजित दादांकडे गेले. मात्र, त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच, रोहित पवार आम्हाला साहेबांकडेही घेऊन गेले, असा खुलासा शेळेकेंनी केला. त्यामुळं रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये, असा सल्ला शेळकेंनी दिला.
आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहत आहेत. पण पवार साहेबांच्या जवळचे दादा हे फक्त अजित दादाचं असू शकतात अन्य कोणत्या ही दादांना ते जमणार नाही, असं म्हणत रोहित पवार हे अजित दादांची जागा घेऊ पाहत असल्याचा ही गौप्यस्फोट शेळेकेंनी केला.
शरद पवार, अजित पवार न्याय मिळवून देण्याचं काम करतायत...
ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा फक्त पक्ष नाही तर तो परिवार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून आमच्यावर अनेक आरोप केले जात आहे. दोन महिने आम्ही सगळे आरोप ऐकत आहोत. राष्ट्रवादी हे परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखं राहिलं पाहिजे. शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार घेत शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पद्धतीने काम करत आहे. सगळ्यांना न्याय कसा मिळेल याचा विचार करुन त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सुनिल शेळकेंचा शब्द न शब्द जशास तसा...
ते पुढे बोलताना म्हणाले की, 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी बंद केलं आणि 22 जूनला आम्ही अजित पवारांच्या दालनात बैठक बोलवायला सांगितलं. त्यावेळी अजित पवारांनी सगळ्यांना बोलवून घेतलं. त्यावेळी बैठकीत मतदार संघाची कामं करायचे असतील तर आपल्याला सत्तेत राहिल्या शिवाय पर्याय नाही. याच बैठकीत ही सर्व चर्चा होत असताना रोहित पवारांनी त्यात आग्रही भूमिका घेतली होती. जर भाजप सत्ता स्थापन करत असेल तर भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली पाहिजे आणि आपण भाजपमध्ये सामील होऊया, अशी रोहित पवारांनी भूमिका होती.
रोहित पवारांची बंडखोर आमदारांवर टीका
अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार हे स्वार्थासाठी गेले आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यादरम्यान केला होता. त्यामुळे अजित पवार गटासोबत गेलेले सगळे कार्यकर्ते रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना दिसत आहे.