शनिवारवाड्याजवळील दर्गा किती जुना? पेशव्यांचा दर्ग्यावर आक्षेप होता का?
शनिवार वाड्याच्या दर्ग्यावरुन पुन्हा हिंदू-मुस्लिम बांधवात वाद पेटण्याची शक्यता आहे. मात्र ही मागणी करणे म्हणजे मुर्खपणा आहे, असं मत इतिहास अभ्यासक संजय सोनावणी यांनी व्यक्त केलं आहे.
Pune Shaniwar Wada Darga : पुण्यातील शनिवार वाड्याजवळील (Shaniwar wada) हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटवा, अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे. हा दर्गा किमान 30 वर्षांपूर्वीचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावरुन आता पुन्हा हिंदू-मुस्लीम बांधवात वाद पेटण्याची शक्यता आहे. मात्र ही मागणी करणे म्हणजे मूर्खपणा आहे, असं मत इतिहास अभ्यासक संजय सोनावणी यांनी व्यक्त केलं आहे. ब्राह्मण महासंघाच्या या मागणीमुळे पुन्हा हिंदू-मुस्लीम रस्त्यावर येणार. त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक द्वेष निर्माण होणार असल्याचंदेखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
दर्ग्याला पेशव्यांचा आणि पालिकेचा आक्षेप नाही
शनिवार वाड्याच्या परिसरात असलेला दर्गा हा पहिल्या बाजीरावांच्या काळातील आहे. ज्यावेळी या शनिवार वाड्याचं बांधकाम सुरु होतं. त्याकाळापासून हा दर्गा या परिसरात आहे. त्या काळात पेशव्यांना या दर्ग्यावर आक्षेप असता तर शनिवार वाड्याचं बांधकाम करतानाच हा दर्गा हटवण्यात आला असता. मात्र त्या काळात या दर्ग्यावर पेशव्यांनी आणि बाकी जनतेने काहीही आक्षेप घेतला नव्हता. शेकडो वर्षांनंतर देखील या दर्ग्याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. पुणे महापालिकेला देखील या दर्ग्यावर आक्षेप घ्यावा, असं वाटलं नाही. त्यामुळे वादाला तोंड फोडायचं काम सुरु असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
एखाद्या इतिहासकाराने दर्ग्याबाबत आक्षेप का घ्यावा?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्राह्मण महासंघाने केलेली ही मागणी फक्त वाद निर्माण करणारी आहे. वाद निर्माण करणारे संघाचे हस्तक आहेत. वाद निर्माण करण्यासाठी असा कोणताही मुद्दा काढण्यापेक्षा या सगळ्यांनी आधी इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, अशी परखड भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
हिंदू महासंघाने मुर्खपणा करु नये
कोणत्याही वास्तू जवळील दर्गा हटवा किंवा अशा प्रकारच्या काहीही तत्थ नसलेल्या मागण्या करुन ब्राह्मण महासंघाने मूर्खपणा करु नये. या सगळ्या वादात किंवा प्रकरणात इतिहासकारांची महत्वाची भूमिका असते. त्यांनी अशा प्रकरणात जबाबदारीने आपली मतं किंवा त्याचा इतिहास मांडावा. त्यामुळे सामाजिक वाद कमी होण्याची शक्यता जास्त असेल, असंही ते म्हणाले.
दर्ग्यात जाणाऱ्या हिंदूंना फाशी देणार का?
दर्गा हा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या श्रद्धेचा भाग आहे. अनेक दर्ग्यात हिंंदू लोकही दर्शनाला जातात. नवस देखील बोलतात. त्यामुळे दर्ग्यात सगळ्या धर्माची लोक जात असतील तर त्या दर्ग्यात जाणाऱ्या हिंदूंनाही फासावर चढवणार का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्या काळातील लोक धर्माचा द्वेष करणारे नव्हते त्यामुळे अनेक ठिकाणी असे दर्गे आढळतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यतील प्रत्येक मंदिर आणि दर्ग्याला इतिहास नाही
पुणं हे ऐतिहासिक शहर आहे. या पुण्यात शेकडो मंदिरं, मशिदी आणि धार्मिक श्रद्धास्थानं आहे. प्रत्येक मंदिराचा असा खास इतिहास असू शकत नाही. लोकांच्या श्रद्धेमुळे ही ठिकाणं तयार झाली आहे. पूर्वीच्या काळाच टॅक्सही लागत नव्हता त्यामुळे अनेकांनी आपलं श्रद्धास्थान म्हणून मंदिर, मशिदी आणि कबरी बांधल्या आहेत.