
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : डुलकी लागली की बझर वाजणार, आठवीतल्या मुलाचं भन्नाट संशोधन, समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर सुचली संकल्पना
आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने चक्क चालकाला डुलकी लागल्यास अलर्ट देणारा गॉगलची निर्मिती केली आहे. आयुष घोलप असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पुणे : समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या (Pune news) मार्गावर होणाऱ्या अपघाताची (Samrudhi highway Accident) सगळ्यात जास्त चर्चा झाली. या अपघाताची (samrudhi mahamarga) कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि उपाययोजनादेखील केल्या जात आहे. चालकाचा डोळा लागल्याने झालेल्या अपघातांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. यावरच आता पुणे जिल्ह्यातील आठवीतील मुलाने उपाय शोधून काढला आहे. आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने चक्क चालकाला डुलकी लागल्यास अलर्ट देणारा गॉगलची निर्मिती केली आहे. आयुष घोलप असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील या मुलाने आगळ्यावेगळ्या गॉगल प्रयोगाची चर्चा सर्वत्र होत असून त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत.
अनेक नागरिक रात्रीचा प्रवास करतात. समृद्धी महामार्ग असो किंवा कोणताही महामार्ग रात्रंदिवस या महामार्गावर वाहतूक असते. याच महामार्गांवर अनेकदा मोठे अपघात होतात आणि या अपघातात अनेकांना आपली जवळची माणसं गमवावी लागतात. या सगळ्या अपघातात रात्री डुलकी लागल्याने झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यात या मुलाने तयार केलेल्या या गॉगलमुळे चालकाने डोळे झाकल्यास लगेच अलर्ट मिळणार आहे. या गॉगलसाठी पेटंट मिळवण्याचं काम सध्या सुरु आहे.
आयुष घोलप हा अवसली खुर्द गावातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतो. त्याला लहानपणापासून नवनवे प्रयोग करण्याची आवड आहे. त्याच्या शाळेतदेखील त्याने केलेल्या प्रयोगाची चर्चा होते. शालेय विज्ञान प्रकल्प विषयात रस्त्यावरील अपघात कमी होण्यासाठी मदत करणारा गॉगल विकसित केला आहे. रात्रीच्या वेळी लांबच्या पल्यावर जाणारे सर्व अवजड वाहन चालक, ट्रॅव्हल बस, परराज्यात जाणारे ट्रक व इतर अनेक वाहन चालक या गॉगलचा वापर करू शकतात, असा दावा त्याने केला आहे.
विज्ञान प्रदर्शनीत सक्रिय सहभाग...
हा गॉगल वाहन चालकाने घातल्यास आणि त्याला झोप आल्यानं त्याचे डोळे झाकले की गॉगलचं सेन्सर ऑन होऊन चालकास अलर्ट करणारे बझर ( साऊंड ) वाजेल आणि वाहन चालक अलर्ट होऊन वाहनावर लक्ष ठेवून व्यवस्थित वाहन चालवू शकणार आहे, असा दावा केला आहे. आयुष हा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. त्यांच्या शाळेच्यामार्फत तो दरवर्षी विविध विज्ञान प्रदर्शनीत भाग घेत असतो आणि नवीन प्रयोग करत असतो. त्याचे दरवर्षी भन्नाट प्रयोग होतात. मात्र या वर्षी तयार केलेल्या या गॉगलची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
गॉगल बनवण्यासाठी हे वापरले साहित्य..
आयुष घोलप या विद्यार्थ्यांनी गॉगल तयार करण्यासाठी सेन्सर, बटन, बजर, गॉगल, बॅटरी, चार्जर इत्यादी साहित्य वापरले असून यासाठी फक्त अडीचशे रुपये खर्च आला आहे. भविष्यात या गॉगलवर तज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून गॉगल विकसित करून वापरात आला तर हजारो वाहन चालकांचे व प्रवाशांचे प्राण वाचणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
