Pune Mango Price : गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदीसाठी गर्दी; पुण्यात आंब्याचे दर किती?
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आंबा खरेदीसाठी अनेक पुणेकरांनी गर्दी केली आहे. कोकणातून विविध जातीचे आंबे मार्केड यार्ड परिसरात दाखल झाले आहेत.
Pune Mango Price : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) पुण्यात (Pune News) आंबा (Mango Price) खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. गुढीपाडव्यापासून आंबा खाण्यासाठी सुरुवात केली जाते. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आंबा खरेदीसाठी अनेक पुणेकरांनी गर्दी केली आहे. कोकणातून विविध जातीचे आंबे मार्केड यार्ड परिसरात दाखल झाले आहेत. रत्नागिरीचा हापूस आणि देवगड आंब्यांबरोबरच बाकी जातीच्या आंब्यांनाही चांगली मागणी आहे.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या आहे. बाजारात आंब्यांची आवक सुरु आहे. पुणेकर रत्नगिरीच्या हापूस आंब्याला पसंती देत आहे. बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यातून कर्नाटक आणि केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे.
अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका
यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण झाली होती. त्यात काही परिसरात तापमानातील उच्चांकामुळे आंब्यावर काळे डागदेखील पडले आहेत. मात्र फटका बसूनही आंब्यांच्या दरात फारशी घट झाली नाही आहे.
आंब्याचा दर किती?
पुण्यात रत्नागिरी हापूस आंब्याबरोबरच कर्नाटकचा हापूस आंब्यांचीही पुण्यातील मार्केट यार्डात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आवक होते. या दोन्ही आंब्यांच्या किमतीत फारसा फरक नसतो. मात्र चवीत मोठी तफावत असते. त्यामुळे अनेक पुणेकर निरखून आंबा खरेदी करतात. साधारण 800,1000 ते 1200 रुपये एक डझन आंब्यांसाठी मोजावे लागत आहेत. तर तीन ते साडे तीन हजार रुपये एका आंब्याच्या पेटीची किंमत आहे. आंब्याच्या सिझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र आंब्यांच्या दर आता जे आहे तेच कायम राहतील, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी मार्केटयार्ड, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रंगांतील गाठींसह ड्रायफ्रूट असलेल्या साखर गाठी आणि विविध प्रकारांतील गाठींना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. पूजेचे साहित्य, गाठी, गुढी खरेदीसाठी महिलांची मंडई, मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
पुण्यात उत्साहात गुढीपाडवा साजरा
पुण्यात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. पारंपारिक वेशात पुणेकर सकाळी एकत्र आले होते. मोठी शोभायात्रादेखील निघाली होती. त्यात लहानग्यांनी पारंपारिक वेश परिधान केले होते तर तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात नव्या वर्षाचं स्वागत केलं.