Pune News : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
पुण्यातील बांधकाम व्यावसायित अविनाश भोसलेंची (Avinash Bhosle) 40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही माहिती ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही माहिती ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता.
ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.
— ED (@dir_ed) June 21, 2021
अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीने काही महिन्यांपूर्वी चौकशीसाठी बोलावलं होतं.अविनाश भोसले हे नाव महाराष्ट्रात नेहमीच वादग्रस्त ठरलंय. कधी जलसंपदा विभागातील कोट्यावधी रुपयांच्या कंत्राटांसाठी, तर कधी सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांसाठी राज्य मंत्री विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.
अविनाश भोसले यांचा रिक्षाचालक ते तीन हेलिकॉप्टर खरेदीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास!
अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. अविनशान भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल वेस्टिन- पुणे हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा याचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले तेव्हा रिक्षा चालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. पुढे ते रिक्षा भाड्यानं चालवण्यासाठी देऊ लागले. पुढे अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली आणि अविनाश भोसले रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले. पुढे सासर्यांच्या माध्यमातून त्यांना अधिक मोठी काम मिळायला लागली.