Aditya Thackeray : तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा; आदित्य ठाकरेंची थेट शेतीच्या बांधावरुन मागणी
तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
Aditya Thackeray : तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी आज नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून उभी आहे. सरकारमध्ये नसल्याने तुम्हाला देण्यासाठी आमच्या हाती काही नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी कर्जमुक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली होती. मात्र आताही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तातडीची नुकसान भरपाई दिली पाहिजे, शेतीचे पंचनामे लगेच झाले पाहिजेत. नेते आणि मंत्र्यांनी नुकसानग्रस्त परिसरात दौरे करायला हवेत आणि शेतकऱ्यांना आपल्यासाठी राबणाऱ्या बळीराज्याला आपलं सरकार आहे, असं वाटलं पाहिजे."
आत्महत्येचं पाऊल उचलू नका
नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना खंबीर सोबत असल्याचा विश्वास दिला. जीवाचं काही बरं वाईट करुन घेऊ नका, आत्महत्येचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करुन आपल्याला काहीही मिळणार नाही. आपल्याला आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना कायम तुमच्या सोबत आहेत,त्यामुळे आत्महत्या करु नका, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली.
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी लढा देऊ: आदित्य ठाकरे
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन घ्यायचा असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. शेतकरी, देशाचा नागरिक म्हणून आपल्याला आपला आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना धीर द्यायला जातोय: अदित्य ठाकरे
राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत, असं त्यांनी दौऱ्यासाठी रवाना होताना माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.