Pune News : आमचं घर आम्हाला परत करा; भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळून पुण्यात ज्येष्ठ दाम्पत्याचं उपोषण
पुण्यात भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळलेल्या आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या वृद्ध दाम्पत्याने गांधीवादी मार्गाने लाक्षणिक उपोषण आंदोलन पुकारले.
Pune News : पुण्यात भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळलेल्या आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या वृद्ध दाम्पत्याने गांधीवादी मार्गाने लाक्षणिक उपोषण आंदोलन करत 'भाडेकरू, आम्हाला आमचं घर देता का घर?' अशी आर्त हाक दिली. बिबवेवाडीतील आपल्याच घरासमोर बसून उपोषण करण्याची वेळ डॉ. अविनाश फाटक आणि माधुरी फाटक या वृद्ध दांपत्यावर आली आहे. डॉ. अविनाश फाटक 72 वर्षांचे, तर माधुरी 67 वर्षांच्या आहेत. त्यांच्या या आंदोलनाला अन्य 8 ते 10 वृद्ध नागरिकांनी उपोषणाला बसून साथ दिली.
फाटक दाम्पत्याने सदानंद सोसायटीतील आपला 'सरस्वती' हा बंगला आतिश जाधव यांना पाच वर्षांच्या भाडेकरारावर 'किडझी' हे नर्सरी स्कुल चालवण्यासाठी दिला होता. हा करार या वर्षाखेरीस संपणार आहे. सलग तीन महिने भाडे थकवल्यास जागा सोडावी लागेल, अशी तरतूद रजिस्टर अग्रीमेंट केलेल्या भाडेकरारात आहे. असे असतानाही गेल्या साडेतीन वर्षांपासून आतिश जाधव भाडे देत नाहीत. या ठिकाणी पोटभाडेकरू ठेवून अन्य व्यवसाय अनधिकृतपणे करत आहेत. वारंवार फोन करण्याचा, भेटण्याचा प्रयत्न करूनही टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात फाटक दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतलेली असून, त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे.
याबाबत बोलताना डॉ. अविनाश फाटक म्हणाले, आतिश जाधव यांनी गोड बोलून आमच्याकडून जागा भाड्याने घेतली. सुरुवातीला वर्षभर भाडे नियमित दिले. मात्र, पुढे वारंवार भाडे मागूनही दिले नाही. परिणामी, आम्ही न्यायालयात गेलो. मात्र, तिथेही 'तारीख पे तारीख' सुरु असून, जाधव किंवा त्यांचे वकील न्यायालयात हजर राहत नाहीत. साडेतीन वर्षे भाडे नाही, पण आम्हाला मालमत्ता कर भरावा लागतो. कायदेशीर लढाईत मोठा खर्च होत आहे. उतारवयात आम्हाला उत्पन्नाचे हे एकमेव साधन असताना उत्पन्न शून्य आणि खर्च मोठा, अशी आमची अवस्था झाली आहे. जागा बळकावण्याची भाषा जाधव यांच्याकडून वारंवार होत आहे.
या सगळ्यात आम्ही आर्थिक विवंचनेत सापडलो आहोत. हक्काचे घर असताना आम्हाला भाड्याने किंवा मुलीच्या घरी जाऊन राहावे लागत आहे. या सगळ्याचा आमच्या दोघांच्या मनावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला असून, माझा रक्तदाब व हृदयविकारचा त्रास वाढला आहे. माझी पत्नी माधुरी हिला निद्रानाशाचा त्रास सुरु झाला असून, सततच्या चिंतेने आमच्या दोघांचे जीवन अवघड बनले आहे. जाधव यांच्याकडून होणारी मुजोरी, न्यायालयाची दिरंगाई यामुळे आम्ही खचलो असून, आम्हाला प्राणांतिक उपोषण करण्याशिवाय अन्य पर्याय उरला नाही. त्यामुळेच आम्ही आज उपोषण करत आहोत, असे डॉ. अविनाश फाटक यांनी सांगितले.
शाळेत प्रवेश घेऊ नये...
फाटक दाम्पत्याच्या या जागेत किडझी नर्सरी स्कुल चालू आहे. शाळा चालवणारे आतिश जाधव फाटक दाम्पत्याची फसवणूक करत आहेत. या जागेचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना इथे प्रवेश घेऊ नये. तसेच फाटक दाम्पत्याच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन करणारी पत्रके आंदोलनकर्त्यांनी परिसरात वाटले.