रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव; पीडितेच्या आरोपाने खळबळ
Pune News : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांनी दबाव आणला असल्याचा आरोप पीडितेने केल्याने खळबळ उडाली आहे.
Pune News : पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज तिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फुस लावल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाल आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये १९ फेब्रुवारीला या बाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पीडितेने आता चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. या पीडितेच्या दाव्यानुसार चित्रा वाघ याच्या सांगण्यावरून तिने हे सगळं केलं होतं. मला सुसाईड नोट लिहण्यास भाग पाडले तसेच तसेच खोटे मेसेज वाचून दाखवले. हे मेसेज मी पाठवले नाहीत किंवा त्यानेही पाठवले नाहीत. त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना सांगणार असल्याचे पीडितेने सांगितले आहे.
पुण्यातील शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी त्यानंतर अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन रघुनाथ कुचिक यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते.
या प्रकरणात चित्रा वाघ यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी शेवटी 'दूध का दूध, पानी का पानी' हे झालंच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या पीडित मुलीचे अपहरण झाल्याचा दावाही चित्रा वाघ आणि या मुलीने केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांना या मुलीचा शोध घ्यावा लागला. काही दिवसानंतर ही पीडित मुलगी सर्वांसमोर आल्यानंतर पुणे पोलीसांनी तिच्याकडे चौकशी सुरु केली होती. त्यानंतर या मुलीने आता चित्रा वाघ यांनी तिला बळजबरीने आरोप करायला लावले असं म्हटलं आहे. त्याबद्दल आपण चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही पीडितेने म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: