Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वी खळबळजनक दावा केला होता. त्यानुसार, पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आणि तिकीट देण्यासाठी कोट्यवधि रुपयांची डील केली जाते.

हरयाणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही (Congress) राजकीय हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच, पंजाबमधील काँग्रेसमध्ये चांगलाच भूकंप झाल्याचं पाहायला मिळत असून काँग्रेसने नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षातून निलंबित केले आहे. नवज्योत कौर सिद्धू या काँग्रेसच्या माजी आमदार असून काँग्रेस नेते आणि क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्या चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय नसल्याने आणि पक्षाच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून नवज्योत कौर सिद्धू यांचे निलंबन करण्यात आलं.
नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वी खळबळजनक दावा केला होता. त्यानुसार, पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आणि तिकीट देण्यासाठी कोट्यवधि रुपयांची डील केली जाते. 6 डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ सुरू झाला होता. राजकीय वर्तुळात त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळाले, तर विरोधकांच्या हाती आयतं कोलितही सापडलं. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने 2 दिवसांत हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तरनतारण पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार करणबीर सिंह बुर्ज यांना तिकीट देण्यासाठी 5 कोटी रुपये घेण्यात आले होते, एकूण रक्कम 11 कोटीपर्यंत पोहोचल्याचा खळबळजनक दावा नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता. विशेष म्हणजे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरुनच हे काम करण्यात आलं असून अनेक नगरसेवक याबाबत बोलायला तयार आहेत, आपल्याकडे त्याचं कॉल रेकॉर्डिंग असल्याचेही नवज्योत कौर यांनी म्हटलं होतं.
Dr Navjot Kaur Sidhu has been suspended from the Congress party with immediate effect. pic.twitter.com/8dGjNaLn5n
— ANI (@ANI) December 8, 2025
दरम्यान, नवज्योत कौर यांच्या या वक्तव्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केली होती. पंजाबमधील भाजप अध्यक्ष सुनील जाखड यांनीही या वक्तव्याला दुजोरा दिला होता. मी देखील अशा रकमेची चर्चा ऐकली होती, असे जाखड यांनी म्हटले. जाखड हेही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. दरम्यान, केंद्रीयमंत्री रवनीत सिंह बिटू यांनीही असाच दावा केला असून, 2004 नंतर काँग्रेसमध्ये प्रत्येक गोष्ट विकली जात आहे, असे म्हटले. मात्र, काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. प्रगट सिंग यांनी अशाप्रकारे पैशांची मागणी कधीही करण्यात आली नसल्याचं म्हटलं. तसेच, नवज्योत कौर यांचं हे व्यक्तिगत मत असू शकतं, असेही प्रगटसिंग यांनी सांगितलं.
हेही वाचा
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन























