इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
IndiGo Airlines News : इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
IndiGo Airlines News : गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या (IndiGo Airlines) नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
लगीन सराईच्या हंगामात फुलांची जोमाने मागणी होते. हा काळ फुल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस घेऊन येतो. मात्र इंडिगो एअर लाईन्सच्या गोंधळाचं विघ्न आलं अन देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटींचं नुकसान झालं. आपल्या भारतात रोज देशांतर्गत 40 लाख गुलाब फुलांची वाहतूक होते, त्यातील 25 टक्के म्हणजे 10 लाख गुलाबांची रोजची वाहतूक ही विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळानं ही गुलाबांची फुलं विविध विमानतळांवर पडून आहेत.
10 लाख गुलाबाचे रोजचे दोन कोटी म्हणजे गेल्या पाच दिवसांत 10 कोटींचा फटका
आज एका गुलाबाला वीस रुपयांचा भाव आहे, हे पाहता 10 लाख गुलाबाचे रोजचे दोन कोटी म्हणजे गेल्या पाच दिवसांत 10 कोटींचा फटका गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. आता हे नुकसान कोण भरुन देणार? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुलांची शेती आहे. येथील गुलांबाची मोठ्या प्रमाणात निर्यात विविध राज्यांसह परदेशात देखील केली जाते. मात्र, विमान सेवा खोळंबल्यामुळं याचा मोठा फटका शेकऱ्यांना बसला आहे.
सध्या इंडिगो मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे
सध्या इंडिगो मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. हजारो उड्डाणे रद्द झाली आहेत आणि त्यांच्या स्टॉकमध्ये 16 टक्के घट झाली आहे. वाढत्या किमती, कमकुवत होत चाललेला रुपया आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे ब्रोकरेजना त्यांच्या लक्ष्यित किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. ज्या प्रकारे उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत आणि शेअर्स घसरत आहेत, त्यामुळे इंडिगोचे पुढ काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सलग सातव्या दिवशी एअरलाइनला तोटा सहन करावा लागला
इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, गेल्या सहा दिवसात इंडिगो एअरलाइन्सला 37 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारीही घसरण सुरूच राहिली, ती 10 टक्क्यांवर घसरुन 4842 रुपयांवर आली आहे. सलग सातव्या दिवशी एअरलाइनला तोटा सहन करावा लागला. देशातील हवाई प्रवासात झालेल्या गंभीर व्यत्ययाच्या परिणामांवर गुंतवणूकदारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असता, सहा दिवसांत या शेअरमध्ये 16.4 टक्के घसरण झाली आहे, ज्यामुळे त्याचे बाजारमूल्य 37000 कोटींपेक्षा जास्त घसरले आहे.
























