Pune Elections : पुण्यातही मुंबईप्रमाणे एक सदस्यीय प्रभाग करा, चार सदस्य नकोत; नव्या प्रभाग रचनेला ठाकरे सेना आणि काँग्रेसचा विरोध
Pune Municipal Elections : एका प्रभागात जर एकापेक्षा जास्त नगरसेवक असतील तर काम करता येत नाही. भाजपला फक्त सत्तेशी मतलब आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे.

पुणे : मुंबई प्रमाणेच पुण्यातही एक सदस्यीय प्रभागरचना व्हावी. जर चार सदस्यीय प्रभाग रचना आमच्यावर लादली तर आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिला. त्यासोबतच पुण्यातील काँग्रेसने देखील या चार सदस्य प्रभाग रचनेला विरोध केला.
चार सदस्यीय प्रभाग हे महानगरपालिकेमध्ये योग्य नाही. त्याच्या बदल्यात एक सदस्यीय प्रभाग केला पाहिजे. असं केल्यास नगरसेवकाला नीट काम करता येते. भारतीय जनता पक्षाला फक्त सत्ता भोगायची आहे. नागरिकांच्या समस्यांवर त्यांना काम करायचं नाही. आमचा या निर्णयाला विरोध आहे. भारतीय जनता पार्टी मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही रडीचा डाव खेळणार असं काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटलंय.
Pune Municipal Elections Ward : मुंबई वगळता इतर ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेमध्ये जुनेच 227 प्रभाग कायम असून त्या ठिकाणी एक सदस्यीय प्रभाग असणार आहेत. त्याव्यतिरिक्त राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन ते चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. पुण्यामध्येही बहुसदस्यीय प्रभाग असणार आहेत. पुण्यामध्ये 162 नगरसेवक असणार आहेत. त्या हिशोबाने प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
अ वर्ग महानगरपालिका - पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका - नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
ड वर्ग महापालिकांमध्ये तीन ते पाच सदस्य
ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतोवर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा 5 सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग 3 सदस्यांचे होतील. ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.
Pune Elections : दाद कुणाकडे मागणार?
गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेमध्ये प्रशासक असल्याने प्राथमिक प्रश्न मार्गीच लागले नसल्याचं दिसून आलं. दाद मागायला नगरसेवक नाही आणि अधिकाऱ्यांकडे जाण्याची सामान्य नागरिकांची पोहोच नाही. त्यामुळे पुण्यातल्या अनेक परिसरातले प्रश्न आहे तसेच आहेत. प्रश्न आहे, मात्र वाली नाही असं काहीसं चित्र आहे. त्यामुळे दाद नेमकी कोणाकडे मागावी असा प्रश्न प्रत्येक पुणेकराला पडला आहे. सोबतच हा सगळा कारभार फक्त ठेकेदारांना हवा तसा चाललाय असे स्पष्ट मत पुणेकरांनी व्यक्त केलं.
ही बातमी वाचा:























