(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll : पुण्याचे खासदार ठरले? जगदीश मुळीक यांची भावी खासदार म्हणून उल्लेख असलेली बॅनरबाजी; राष्ट्रवादीने घेतला समाचार
‘भावी खासदार जगदीश मुळीक’ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत, पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झाले असताना, पुण्यातील मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.
Pune jagadish Mulik Flex : ‘भावी खासदार जगदीश मुळीक’ (jagdish mulik) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत, पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीनच दिवस झाले असताना, पुण्यातील मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. जगदीश मुळीक यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना भावी खासदार म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या बॅनरवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. हाच का तुमचा वेगळेपणा म्हणत त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. 10 दिवसांचे सुतक तर संपू द्या मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात…आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा... बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजून वाहत आहेत .. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार,असंही आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
त्यासोबतच विरोधीपक्ष नेते अजित पवारांनीदेखील या बॅनरबाजीवर चांगलीच टीका केली आहे. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. आपण 13 ते 14 दिवसांचा दुखवटा पाळतो. याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवावं, असं आवाहनदेखील अजित पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनीदेखील हे बॅनर ट्विट केलं आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू द्यायची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले.जनाची नाही मनाची तरी ठेवा, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
वाढदिवस साजरा करणार नाही; जगदीश मुळीक
बापट यांचं निधन झाल्याने मी वाढदिवस साजरा करणार नाही, असं भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केलं होतं. अनेकांना मेसेज करुन त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. '1 एप्रिल 2023 रोजी माझा वाढदिवस आहे. खासदार गिरीश बापट यांच्या दुःखद निधनानंतर वाढदिवस साजरा करायचा नाही असा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या अनुषंगाने नियोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही चॅनेलवर वाढदिवसाच्या जाहिराती देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. तरीही अनवधानाने आपल्याकडे कोणी व्यक्ती किंवा संस्था यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात संपर्क केला असेल तर अशी जाहिरात आपण स्वीकारू नये आणि प्रसिद्ध करू नये अशी विनंती मी करतो', असा मेसेज त्यांनी अनेकांना पाठवला होता.