Pune Jain Boarding : मोठी बातमी, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यात येणार, बिल्डर विशाल गोखलेंचा मोठा निर्णय, राजू शेट्टी म्हणाले उताऱ्यावरील नाव कमी होईपर्यंत लढा सुरु राहील
Jain Boarding : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतला आहे. जागेचा रद्द व्यवहार केल्याचं गोखलेंनी ई-मेलद्वारे ट्रस्टला कळवलं आहे.

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबर केलेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतला आहे. जैन बोर्डिंगच्या जागेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला होता. शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील हा विषय लावून धरला होता. रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहारावरुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केल होते.
जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा व्यवहार रद्द : विशाल गोखले
जैन बोर्डींग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय विशाल गोखले यांनी घेतला आहे. या जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखले यांनी ईमेल वरुन ट्र्स्टला कळवला असल्याची माहिती आहे. या व्यवहारातून बाहेर पडण्याचा गोखले यांनी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखले याचं ईमेल मध्ये म्हणणं आहे. याशिवाय जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असंही विशाल गोखले यांनी म्हटलं आहे.
राजू शेट्टी यांच्या आज संध्याकाळी केलेल्या आवाहानानंतर गोखले यांच्याकडून जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत झालेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवहार रद्द करण्याच्या निर्णयाची माहीती राजू शेट्टी यांना कळवली गेली असल्याची माहिती आहे. दरम्यान, गोखले बिल्डर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अर्ज देण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दुपारी 86 हून अधिक जैन संस्था, संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला तो बेकायदेशीर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असताना 60 वर्षांहून अधिक वर्ष सुरु असलेल्या वसतिगृहाची जागा विकणं ही लाजिरवाणी बाब आहे. हा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा,अशी विनंती ट्रस्टींना करण्याचं त्याचबरोबर ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्या गोखले बिल्डर यांना विनंती करण्याचा ठराव झाला, असं राजू शेट्टी म्हणाले. गोखले बिल्डरला केलेल्या विनंतीनुसार त्यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला आहे. जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, या मालमत्तेवर गोखले बिल्डरचं नाव चढलेलं आहे ते काढून जैन बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे, सरकारनं पुढाकार घ्यावा, असं राजू शेट्टी म्हणाले.
रवींद्र धंगेकर उद्या जैन बोर्डिंगला भेट देणार
शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर हे उद्या जैन बोर्डिंगला भेट देणार आहेत. यावेळी ते जैन मुनींचे आशीर्वाद घेणार आहेत. रवींद्र धंगेकर यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच बिल्डर विशाल गोखलेंकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


















