(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दगडूशेठ'चा निर्णय वैयक्तिक, आमची मिरवणूक 6 नंतरच, पुण्यातील चार मोठ्या मंडळांचा निर्धार
Ganesh Visarjan 2023 : दगडूशेठ गणपती मंडळाच्या निर्णयाविषयी आपल्याला आक्षेप नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याबाबत आपली भूमिका वेगळी आहे.
पुणे: अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, गणपती मंडळं नेहमीच्या वेळेत विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganesh Visarjan 2023) सहभागी होणार आहे. मंडई, भाऊसाहेब रंगारी गणपतींची मिरवणूक उशीरा निघणार आहे. दगडूशेठ गणपती मंडळाच्या निर्णयानंतर पुण्यातील चार मंडळांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. दगडूशेठ गणपती मंडळाने घतलेला निर्णय वैयक्तिक आहे. मंडळाच्या निर्णयाविषयी आम्हाला आक्षेप नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्याच्या उद्देशानं यंदा सायंकाळी 4 वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचं निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानं घेतला आहे. मात्र तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचा सांगत इतर मंडळांनी त्याला सहमती नसल्याचं स्पष्ट केलंय. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन दरवर्षीप्रमाणेच यंदाही नियोजित वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे, श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या आदी उपस्थित होते.
दगडूशेठ गणपती मंडळाच्या निर्णयाविषयी आम्हाला आक्षेप नाही
दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी निघणे मंडळांना शक्य होत नाही. मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीनंतर इतर गणपती मंडळं लक्ष्मी रस्त्याने मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होतात. त्यामुळे ती मंडळे पुढे जाईपर्यंत इतर मंडळांना लवकर जाणे शक्य नाही. दगडूशेठचा गणपती लवकर सहभागी झाल्यास इतर मंडळं त्यावर आक्षेप घेऊ शकतात. अशावेळी काय करायचं असा प्रश्न मंडईसह इतर प्रमुख मंडळांनी उपस्थित केला आहे. इतकच नाही तर दगडूशेठ मंडळाच्या निर्णयामुळे मिरवणूक लवकर संपणार असल्याची शक्यता देखील त्यांनी नाकारली आहे. दगडूशेठ गणपती मंडळाच्या निर्णयाविषयी आपल्याला आक्षेप नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याबाबत आपली भूमिका वेगळी असल्याचं या मंडळांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.