एक्स्प्लोर
Advertisement
मांजाने गळा चिरल्यावर 'ती' 20 मिनिटं रक्ताच्या थारोळ्यात, एकही गाडी थांबेना
मांजाने गळा चिरल्यानंतर वीस मिनिटं डॉ. कृपाली निकम रक्तांच्या थारोळ्यात पडून होती, मात्र एकही गाडी तिच्या मदतीला थांबली नसल्याचं समोर आलं आहे.
पिंपरी चिंचवड : चायनीज आणि नायलॉन मांजा किती घातक आहे, याची प्रचिती डॉक्टर महिलेच्या मृत्यूमुळे पिंपरी चिंचवडवासियांना पुन्हा आली आहे. मांजाने गळा चिरल्यानंतर वीस मिनिटं डॉ. कृपाली निकम रक्तांच्या थारोळ्यात पडून होती, मात्र एकही गाडी तिच्या मदतीला थांबली नसल्याचं समोर आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाची कायमस्वरुपी बंदी असतानाही हा जीवघेणा मांजा बाजारपेठेत उपलब्ध होत असल्यामुळे प्रशासनाच्या ढिम्मपणाचाच हा बळी म्हणावा लागेल.
डॉक्टर कृपाली निकमच्या आयुष्याची दोर नायलॉन मांजाने कापली. पुण्याहून भोसरीला दुचाकीवरुन परतताना रविवारच्या रात्री नाशिक फाट्याच्या उड्डाणपुलावर मांजाने कृपालीला गाठलं. गळा चिरल्यानंतर ती वीस मिनिटं रक्ताच्या थारोळ्यात पडली, मात्र एकही गाडी तिच्या मदतीसाठी थांबली नाही.
मानेला जखम झाल्यामुळे कृपालीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. वेळीच ती रुग्णालयात पोहचली असती, तर कदाचित कृपालीला जीवदान मिळू शकलं असतं. मात्र माणुसकी संपल्याचं जिवंत उदाहरण या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं.
डॉ. कृपाली माझ्यासमोरच दुचाकीवरुन कोसळल्या. मी त्यांच्या मदतीला गेलो, तेव्हा त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर झाला होता. मी मदतीसाठी अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीच थांबायला तयार नव्हतं. 20 मिनिटानंतर एक गाडी थांबली. शेवटी त्यांना खासगी रुग्णालयात नेलं. त्यानंतर मी तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेलो असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे समजलं, असं सिद्धार्थ बोरावके या तरुणाने सांगितलं.
हा मांजा नेमका या उड्डाणपुलावर कसा पोहचला, कोण पतंग उडवत होतं की जाणीवपूर्वक कोणी इथे कोणी मांजा सोडून गेला, याचा पोलिसांनी शोध सुरु केला.
याच वर्षी 9 जानेवारीला तीन वर्षांच्या चिमुकल्या हमजा खानचा डोळा कापला गेला होता. त्याच्यावर बत्तीस टाक्यांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. 11 जानेवारीला रंगनाथ भुजबळ या ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापता-कापता बचावला. तर 11 फेब्रुवारीला पुण्यात एका वृत्तसंस्थेच्या महिला कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा गळा चिरुन मृत्यू झाला होता.
मकरसंक्रांतीच्या काळात घडलेल्या या घटनांनंतर पोलिसांनी छापेमारी करुन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले. मात्र कृपालीच्या मृत्यूनंतर नायलॉन आणि चायनीज मांजाची राजरोसपणे विक्री सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत चायनीज आणि नायलॉन मांजाची विक्री केली जात नाही, तर केवळ भारतीय बनावटीच्या, त्याही सहज तुटणाऱ्या मांजाची विक्री केली जात असल्याचा दावा मांजा विक्रेते करतात. त्यामुळे पतंगप्रेमींना चायनीज आणि नायलॉन मांजा कसा आणि कुठून उपलब्ध होतो, हा प्रश्न उपस्थित होतो.
सर्वोच्च न्यायालयाने चायनीज आणि नायलॉन मांजावर कायमची बंदी घातली आहे. तरीही बाजारपेठेत हा जीवघेणा मांजा कुणाच्या आशीर्वादाने दाखल होतो, याच्या मूळापर्यंत पोहचून कठोर कारवाईचा बडगा उगारायला हवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement