Vaishnavi Hagawane Death: सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून केलं बडतर्फ; अजितदादांचे दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश
Vaishnavi Hagawane Death: पोलिस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहे. दरम्यान त्यांच्यावरती पक्षानेही कारवाई केली आहे. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने टोकाचं पाऊल उचललं. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या पती, सासू व नणंद यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी (दि. 21) न्यायालयात हजर केले. तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करत 26 मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असणारा सासरा आणि दीर अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना केली आहेत. या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहे. दरम्यान त्यांच्यावरती पक्षानेही कारवाई केली आहे. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे.
राजेंद्र हगवणेंना पक्षातून केलं बडतर्फ
राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण यांनी दिली आहे. सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की, अजित पवार यांचं पुणे सीपी यांच्यासोबत बोलणं झालं आहे. अजित पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. अजित पवार पोलिसांना कायम म्हणतात, चुकीचं काम करणाऱ्याला टायरमध्ये घालून मारा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्यामुळे याही प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की, राजेंद्र हगवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला होता, माझा कोणताही कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्याला टायरमध्ये घेऊन मारावा अशा पद्धतीच्या सूचना अजित दादांनी वारंवार सभेमध्ये दिलेले आहेत. आज या हगवणे प्रकरणांमध्ये सुद्धा अजितदादांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत, माध्यमांना माझी विनंती आहे, या प्रकरणाला पक्षीय रूप न देता याला न्यायाच्या भूमिकेतून पहावं राष्ट्रवादी काँग्रेसची ही भूमिका आहे, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरती कडक कारवाई व्हावी.
नेमकं काय आहे प्रकरण?
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कृर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.























