(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime news : लेशपाल म्हणतो, 'तरुणीचा हल्ला अंगावर घेतला अन् रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो'
मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत, पण ती घटना घडली, तेव्हा रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो, असं लेशपाल जवळगे म्हणाला.
Pune Crime news : सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून (Pune Crime news )मुलीला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे याचं सगळीकडे कौतुक होत आहे. हे कौतुक पाहून त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत, पण ती घटना घडली, तेव्हा रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला सत्काराला बोलावू नका, अशी प्रतिक्रिया लेशपाल याने दिली आहे.
Pune Crime news : फडणवीसांनी थेट फोनवरुन केलं कौतुक
सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा पुणे भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे अभिनंदन केले. त्याच्या धाडसामुळे मुलीचा जीव वाचला त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून तर राजकारण्यापर्यंत सगळ्यांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.
हर्षद पाटील आणि लेशपाल जवळगे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरुन कौतुक केल्याबद्दल खूप छान वाटतंय असं म्हटलं. दोघांनी देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले. या दोघांच्या धाडसाला आता अख्खा महाराष्ट्र सलाम ठोकत आहेत. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मुलीचा जीव वाचला. एवढं करुनही हे आमचं कर्तव्य होतं आमचा सत्कार करु नका, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली आहे.
Pune Crime news : लेशपालची इंस्टा पोस्ट चर्चेत
पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्या मित्राकडून झालेल्या कोयता हल्ल्यातून तिला वाचवण्याचं धाडस लेशपाल जवळगेनं नुकतंच केलं. त्यानंतर लेशपालवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. त्याचे सत्कार सुरु आहेत. एकीकडे लेशपालला शाबासकी असताना दुसरीकडे त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर जातीयवाद्यांना कंठ फुटला. कारण लेशपालच्या एका पोस्टवर काही जणांनी त्या तरुणीची आणि हल्लेखोराची जात विचारण्याचा कहर केला. त्यानंतर लेशपालनं आपल्या इन्स्टा अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. त्यात लेशपाल म्हणतो की, मुलीची आणि मुलाची जात कुठली होती, असं मेसेज करुन विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता, ना ही समाजाचे. तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला कीड लागली आहे, असंही लेशपालनं लिहिलंय.
हेही वाचा-
Pune Crime news : शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात; पाच महिन्यांत 7 कोटी 24 लाखांचे ड्रग्ज जप्त