(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime news : हॅलो, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी बोलतोय! मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून कॉलेजमध्ये प्रवेश देत उकळले पैसे, तरुणाला बेड्या
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बोलतोय असं सांगून नामांकित महाविद्यालयात विद्यार्थांना प्रवेश मिळवून देणाऱ्या भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिकाने हिंजवडी पोलिसांत तशी फिर्याद दिली आहे.
Pune Crime news : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बोलतोय असं सांगून (Pune Crime news ) नामांकित महाविद्यालयात विद्यार्थांना प्रवेश मिळवून देणाऱ्या भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिकाने हिंजवडी पोलिसांत तशी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमधील राहुल राजेंद्र पालांडेला अटक करण्यात आली आहे. तो युवा सेनेचा कार्यकर्ता असून त्याने स्वतःच्या व्हाट्सअँपवर सीएमओ ऑफिसचे बनावट लोगो, सीएम ऑफिसचे प्रोफाईल, बनावट मेल आयडी आणि गुगल लोकेशन ही टाकले होते. सोबतच ट्रूकॉलरला ही सीएमओ ऑफिसचा उल्लेख केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्निकल सगळ्या बाबी चांगल्या ठेवून तो मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आहे, असं विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या संस्थेला भासवायचा. सिम्बायोसिस आणि डी वाय पाटील महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन तक्रार केली, असता हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकारामुळे अनेकांच्या विश्वासाला तडा गेला.
राहुलने मंत्रालयातील अधिकारी बोलतो, असं सांगून सिम्बॉयसिसच्या लवळे, हिंजवडी आणि बेंगलोर तसेच डी वाय पाटील विद्यापीठ असे एकूण चार विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन दिले आणि त्यांच्याकडून पैसे लाटल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिकाने 23 मे ला हिंजवडी पोलीस स्टेशनला येऊन राहुल विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार राहुलला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी खासगी कामासाठी पुण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अनेक बड्या संस्थांचे संस्थापक उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि या संस्थापकांच्या अनेक विषयांवर चर्चा झाल्या त्यानंतर संस्थापकांनी अधिकाऱ्यांना त्यांनी महाविद्यालयातील प्रवेशासासाठी शिफारसीने प्रवेश दिल्याचं सांगितलं. मात्र त्यावेळी अधिकाऱ्यांनी कोणाचीही शिफारस न केल्याचं सांगितलं त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकाराची कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना कोणाला शिफारस पत्र दिले आहेत का?, याची खातरजमा केली. त्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याने शिफारस पत्र कोणत्याही विद्यार्थ्याला, नागरिकाला किंवा महाविद्यालयाला दिलं नसल्याचं समोर आलं.
पलांडे हा बनावट शिफारस पक्ष तयार करुन महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याचं यातून स्पष्ट झालं. शिफारस पत्र देऊन पालकांकडून पैसे उकळत असल्याचं समोर आलं. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यलयातील अधिकाऱ्यांनी पिंपरीत तक्रार केली. त्यानुसार पलांडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने पलांडेला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.