Pune Crime News : चिकनशॉप चालकाचा राडा, डोकं फिरलं अन् थेट पोलीस, नागरिकांवर कोयत्यानं केला हल्ला; पुण्यातील नऱ्हे परिसरात गोंधळाचं वातावरण
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच आता चिकनशॉप चालकाने नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही(Pune Crime news) आहे. त्यातच आता चिकनशॉप चालकाने नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नऱ्हे गावात हा प्रकार समोर आला असून या चिकन शॉप परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या हल्ल्यात पोलीस आणि नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना नऱ्हे गावात घडली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून मोठा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नऱ्हे परिसरात गुन्हेगारीचा आलेख कायमच वाढता राहिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सोमवार रोजी चिकनशॉप चालक हातात कोयता घेऊन फिरत होता. त्याने परिसरात गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र काल त्याने कोणाला काहीही केलं नाही. दरम्यान आज त्याचं डोकं सरकलं आणि त्याने थेट नऱ्हे गावातील नागरिकांवर हल्ला केला. यावेळी पोलीसांनी लगेच धाव घेतली आणि राडा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता चिकन शॉप चालकाने पोलिसांवर सुद्धा हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस आणि नागरिक जखमी झाले. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नऱ्हे गावात गोंधळाचं वातावरण
या सगळ्या घटनेमुळे नऱ्हे गावात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा गोंधळ सुरु झाल्यावर अनेकांनी गर्दी केली होती. अनेकांनी व्हिडीओ काढालयादेखील सुरुवात केली. याच दरम्यान चिकन शॉप चालक पुन्हा चिडला आणि त्याने थेट बघ्यांवर हल्ला करायला सुरुवात केली होती. भरदिवसा झालेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भररस्त्यात असे हल्ले होत असतील तर पुण्यात प्रत्येकाची सुरक्षा धोक्यात असल्याचं दिसत आहे.
पुण्यात कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसतायत. वय अवघे 18- 25 , अंगावर एखादा टी शर्ट टाकायचा, फाटलेली पँट घालायची, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळतोय.