(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात लॉकडाऊनमध्येच सर्वाधिक कोरोना बाधित
पुण्यात 14 तारखेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला असूनदेखील याच काळात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे.
पुणे : पुण्यात 14 जुलैपासून लॉकडाऊन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार 10 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. पुण्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. परंतु, लॉकडाऊनच्या काळातच पुण्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. पुण्यात काल दिवसभरात 2459 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 61 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता, ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.
पुण्यात 14 तारखेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. यादरम्यान, म्हणजेच, 14 जुलै ते 19 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात 11577 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 245 रुग्णांचा या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर याआधी 7 जुलै ते 12 जुलै या आधीच्या सात दिवसांच्या कालावधीत पुण्यात 8658 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 184 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्ण संख्या ही किती हे लोकांच्या टेस्ट होतात यावर अवलंबून असते आणि पुण्यातील टेस्टचे प्रमाण वाढवण्यात आल्यानेच रुग्णसंख्या वाढल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून असा दावा केला जात असला तरिही, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वेगाने वरती गेलाय. त्यामुळेच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल यांना पुण्यात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. तसेच, दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख पाहून पुण्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उपयोग कसा झाला असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
पुण्यात घालण्यात आलेल्या लोकडाऊनचा उपयोग काय झाला असा प्रश्न काहीजण विचारताना दिसत आहेत. तर लॉकडाऊन पुन्हा लागू केला नसता, तर कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊनचा उपयोग बेड आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्यासाठी करण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्रात लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद राहणार?
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांचे आदेश