Pune Bypoll election : उमेदवारांच्या लेकरांचं आयुष्यातलं पहिलं मतदान 'आई-वडिलांसाठी'; म्हणाले हा क्षण...
Pune Election: दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मुलांनी पहिल्यांदाच मतदान केलं आहे. त्यांनी पहिलंच मतदान त्यांची आई अश्विनी जगताप यांच्यासाठी केलं आहे. तर नाना काटे यांच्या मुलीने पहिल्यांदाच वडिलांसाठी मतदान केलं आहे.
Pune Bypoll election : पुण्यात कसबा (Pune Bypoll Election)आणि चिंचवड मतदारसंघाच्या (Chinchwad By Poll Election) पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यात उमेदवारांच्या मुलांनीदेखील त्यांचं पहिलंच मतदान केलं आहे आणि ते मतदान त्यांच्या पालकांसाठी केलं आहे. आयुष्यातलं पहिलंच मत आपल्या पालकांना केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे आणि हा त्यांच्यासाठी सर्वात अभिमानाचा क्षण आहे, अशा भावना उमेदवारांच्या मुलांनी व्यक्त केल्या आहे.
आपल्या आयुष्यातील पहिलं मत कायम आठवणीतलं असतं. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मुलांनी पहिल्यांदाच मतदान केलं आहे. त्यांनी पहिलंच मतदान त्यांची आई अश्विनी जगताप यांच्यासाठी केलं आहे. माझं पहिलं मतदान हे वडिलांसाठीच असेल असं कायम वाटायचं मात्र वडिल अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. त्यामुळे त्यांच्या जागेवर आज आईला खंबीर लढावं लागत आहे. त्यामुळे पहिलंच मतदान हे आईलाच केलं आहे. हे मतदान फक्त विकासासाठी आहे, अशा भावना जगताप यांच्या मुलांनी व्यक्त केल्या आहे. त्यासोबतच जगताप यांची एकुलती एक मुलगी ऐश्वर्या जगताप हिनेदेखील आईलाच मतदान केलं आहे.
चिंचवडचे महविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या मुलीने पहिल्यांदाच वडीलांसाठी मतदान केलं आहे. तनिष्का काटेने आपले पाहिले मत वडिलांना दिले आहे.अनेक जण मतदान करतात परंतु माझे आयुष्यातील पहिले मत हे माझ्या वडिलांना देता आले हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगितले. माझ्या वडिलांसारखा काम करणारा नेता मी आतापर्यंत बघितला नाही आहे. लहानपणीपासून मी वडिलांना लोकांसाठी रात्रंदिवस काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे आज त्यांना मतदान करुन मला अभिमान वाटत आहे. येणाऱ्या काळात वडिल अशीच लोकांची सेवा करते असा मी मुलगी म्हणून जनतेला विश्वास देते, अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.