Pune ATS News : बॉम्ब कसा बनवतात? दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली हाताने लिहिलेली चिठ्ठी
युनस साकी आणि इम्रान खान या दोघांच्या घरात सीलींग फॅनमध्ये लपवलेल्या कागदात हाताने लिहिलेली बॅांब बनवण्याची प्रक्रिया असलेला कागद सापडला.
Pune ATS News : पुण्यात पकडलेल्या दोन (ATS) दहशतवाद्यांसदर्भात (pune terror case) मोठी माहिती समोर आली आहे. हे दोघे राहत असलेल्या घरातील फॅनमध्ये एक कागद सापडला आहे आणि या लपवलेल्या कागदात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हाताने लिहिलेली आहे. ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याचं देखील समोर आलं आहे.
18 जुलै रोजी पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरत असताना हे सापडले होते. दोघेही मागील दीड वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड होते. NIA ने यांना पकडण्यासाठी 5 लाख रुपयांचं बक्षिस घोषित केलं होतं. त्यानंतर पुण्यातील कोथरुड पोलिसांनी दुचाकी चोर म्हणून पडकलं होतं. मात्र त्यांची चौकशी केली असता ते दहशतवादी संघटनेचं काम करत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी पहिल्यांदा वेगळी नावं सांगितली होती. मात्र ट्रू कॉलरवर त्यांची नावं वेगळी आल्याने पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि त्यांनी पुन्हा सखोल चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते दोघे राहत असलेल्या कोंढव्यातील घरात पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे बॉम्ब तयार करण्याची पावडरही सापडली होती. आता त्यांच्याकडे थेट बॉम्ब कसा बनवायचा?, याची माहिती असलेली चिठ्ठी किंवा कागद सापडल्याने या प्रकरणात धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ATS ने काय काय जप्त केलं?
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी यांच्याकडून एटीएसने बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यात आता बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेली चिठ्ठीदेखील सापडली आहे.
जंगलात करायचे बॉम्बस्फोटाचा सराव
पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी (NIA) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोटाचा सराव केल्याच समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र-बेळगाव सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला देखील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते राज्यात विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे.
हेही वाचा-
हेही वाचा-