Pune NIA News : मोठी बातमी! इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर
इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे बाँम्ब स्फोटाचा सराव केला हे तपासात पुढे आलं आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये त्यांनी सराव केला आहे.
![Pune NIA News : मोठी बातमी! इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर Two ISIS terrorists caught by the Pune police practice bomb blasts Pune Satara and Kolhapur Pune NIA News : मोठी बातमी! इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/0f73e5bd4ba85eb970e2007186d200251690628524954442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune NIA News : पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी (NIA) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जावून बॉंब स्फोटांचा सराव केल्याच समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र - बेळगाव सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला देखील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते राज्यात विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे.
पोलिसांनी या जंगलांमध्ये जाऊन या दहशतवाद्यांनी केलेल्या सरावानंतर त्या ठिकाणी मागे राहिलेले अवशेष जप्त केले आहे. त्याचबरोबर जंगलात राहण्यासाठी वापरण्यात आलेले तंबूदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबल्सनी पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्री तिघांना संशयावरून ताब्यात घेतलं होत आणि त्यांची नावं विचारली. त्यांच्याकडील मोबाईलवरून पोलिसांनी स्वतःच्या मोबाईलवर फोन करून ट्रू कॉलरवर नावं तपासली असता ती वेगळी दिसल्याने पोलिस मोहम्मद युसूफ खान, मोहम्मद युनूस साकी आणि मोहम्मद शाहनवाज आलम या दहशतवाद्यांना घेऊन कोंढव्यातील त्यांच्या फ्लॅटवर गेले. फ्लॅटमध्ये पोलिसांना इसिस संबंधी साहित्य आणि स्फोटकांची पावडर सापडली. मात्र मोहम्मद शाहनवाज आलम हा तिसरा दहशतवादी यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस साकी यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते...
‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24 वर्षे), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळलं आहे. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे दोघं 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचं साहित्य जप्त केलं आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंदेखील समोर आलं आहे. या चित्रीकरणात नेमकं काय आहे? पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केलं आहे आणि यात पुण्यातील बाहेरचं चित्रीकरण केलं आहे का?, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)