(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऐकावं ते नवलच! पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरतीत कॉपीसाठी 'मोबाईल मास्क'; पोलीस कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या
Pimpri Chinchwad Updates : पिंपरी चिंचवड पोलीस भरतीत कॉपीचा कट रचल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. त्यानेच मोबाईल मास्कची निर्मिती केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
Pimpri Chinchwad Updates : पिंपरी चिंचवड पोलीस भरतीत कॉपीचा कट रचल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. त्यानेच मोबाईल मास्कची निर्मिती केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. राहुल गायकवाड असं त्याचं नाव असून तो औरंगाबाद पोलीस दलात कार्यरत आहे. राहुलने इतर परीक्षेतील परीक्षार्थींना हे मोबाईल मास्क कॉपीसाठी दिले होते. पैकी नागपूर पोलीस भरतीत एकाने हे मास्क परिधान करून लेखी परीक्षा दिल्याचं ही समोर आलंय. 19 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड पोलीस भरतीची लेखी परीक्षा होती. तेव्हा हिंजवडीच्या परीक्षा केंद्रावर परिक्षार्थींच्या तपासणीत ही धक्कादायक बाब समोर आली होती. पण तेव्हा तो परीक्षार्थी हॉल तिकीट विसरल्याचा बहाणा करून पसार झाला होता. नंतर हिंजवडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि चौकशीत पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाडने या मोबाईल मास्कची निर्मिती केल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.
'मोबाईल मास्क'द्वारे कॉपीचा कट पोलिसांनी असा उधळला!
पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नवी कुमक दाखल करण्यासाठी पोलिस भरती सुरू आहे. याची लेखी परीक्षा 19 नोव्हेंबरला पार पडली. तेंव्हा एका परीक्षार्थीने चक्क मोबाईल मास्कची निर्मिती केल्याचं समोर आलं होतं. पण कॉपी करण्याचा त्याचा हा डाव हिंजवडी पोलिसांनी मात्र हाणून पाडला होता. हिंजवडीच्या ब्लु रिडज शाळेतील परीक्षा केंद्रावर पोलिसांनी केलेल्या तपासात कॉपीची ही नवी आणि धक्कादायक पद्धत समोर आली होती. मात्र तेव्हा मास्क चेक करत असतानाच हा कॉपी बहाद्दर हॉल तिकीट विसरल्याचा बहाणा करून पसार झाला होता. त्यावेळी त्याचा एन 95चा हा मास्क पोलिसांनी तपासला असता त्यात मोबाईल डिव्हाईस, सीम कार्ड, बॅटरी, चार्जिंग कनेक्टर अशा वस्तू म्हणजेच मोबाईलची बॉडी वगळता ज्या वस्तू असतात त्या सर्व त्यात आढळल्या होत्या.
पोलीस कॉन्स्टेबलचं बिंग असं फुटलं?
मोबाईल मास्क मधील डिव्हाईसच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी त्या बहाद्दरचा शोध घेतला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, या मोबाईल मास्कची निर्मिती करणाऱ्या कटाचा मुख्य पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड असल्याचं निष्पन्न झालं. मग हिंजवडी पोलिसांनी औरंगाबाद पोलीस दलात कार्यरत राहुलला बेड्या ठोकल्या. त्याचा मोबाईल ही जप्त करण्यात आला. त्यात 'मोबाईल मास्क'ची निर्मिती करतानाचा संपूर्ण व्हिडीओ आढळून आला आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुलचे बिंग फुटले. त्याशिवाय राहुलने हेच 'मोबाईल मास्क' इतर परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना दिल्याचा अंदाज आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस दलातील 720 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठीची लेखी परीक्षा 19 नोव्हेम्बरला पार पडली. पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर शहारातील 444 केंद्रावर घेण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील या भरती साठी जवळपास 1 लाख 90 हजार उमेदवारांनी अर्ज केला होता. जीए सॉफ्टवेअर ही खासगी कंपनी पिंपरी चिंचवड पोलिस दलासाठी परीक्षा घेतली आहे.