दाखल्यांपासून ते रेशनकार्डपर्यंत बनावटगिरीचा कळस; IAS पूजा खेडकरच्या चिंधीगिरीचा आणखी एक कारनामा समोर
बनावट रेशनकार्डच्या आधारे पूजाने पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते आणि त्याच आधारे तिला डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी आधू असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं.
पुणे : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे (Pooja Khedkar) रोज एक नवे प्रताप समोर येत आहे. खेडकर कुटुंबीयांनी बनवलेलं बनावट रेशनकार्ड एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. याच रेशनकार्डच्या आधारे पूजाने पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते आणि त्याच आधारे तिला डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी आधू असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं. पुढं याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले होते. अशातच हे प्रमाणपत्र योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित झाला असताना खेडकर कुटुंबीयांनी बनवलेलं बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती लागेलेलं आहे. थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता देत खेडकर कुटुंबीय रहिवाशी असल्याचं या रेशनकार्ड द्वारे दाखवण्यात आलं होतं.
साधारण 9 जुलैपासून पूजा खेडकरांचं प्रकरण समोर आल्यापासून ते आजपर्यंत रोज नवेनवे खुलासे आणि चक्रावून टाकणारी बनावट कागदपत्रांची प्रकरणं आता समोर येत आहेत.
पूजाचे आतापर्यंतचे कारनामे
- 9 जुलै - पूजा खेडकरांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर
- 10 जुलै - दिव्यांगांच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर
- 11 जुलै - ओबीसी कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर
- 12 जुलै - पूजाची आई मनोरमा खेडकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर
- 13 जुलै - पूजा खेडकरांनी लाल दिवा वापरताना नियमांचा भंग केल्याचं स्पष्ट, पोलिसांकडून कारवाई सुरू
- 14 जुलै - ऑडी कार पोलिसांकडून जप्त, पूजा खेडकरांचे आईवडील गायब असल्याचं स्पष्ट
- 15 जुलै - एमबीबीएस करताना पूजा खेडकरांचं काशीबाई नवले महाविद्यालयात वेगळं नाव असल्याचं समोर
- 15 जुलै - वडील क्लास वन अधिकारी असतानाही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देऊन एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचं समोर
- 16 जुलै - पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला DoPT कडून स्थगिती
- 19 जुलै - पूजा खेडकरांवर यूपीएससी एफआयआर दाखल करणार
- 19 जुलै - थर्मोव्हेरिटा कंपनी पिंपरी- चिंचवड पालिकेकडून सील
- 19 जुलै - पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचं बनावट रेशनकार्ड एबीपी माझाच्या हाती
मात्र त्याचवेळी पूजा खेडकरला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनातल्या ज्या भ्रष्ट लोकांनी मदतीचा हात दिला त्यांच्यावर कधी ही कारवाई केली जाणार असाही प्रश्न पडत आहे.
हे ही वाचा :
पूजा खेडकरची उलटी गिनती सुरु, UPSC गुन्हा दाखल करणार, पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली!