(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune PMC News : पुण्यात काही 'आय लव्ह' बोर्डांशी ब्रेकअप; उरलेल्या अनेक बोर्डाचं काय?
पुण्यात अनेक ठिकाणी लागलेल्या 9 'आय लव्ह' बोर्डावर अखेर आकाश चिन्ह विभागाने कारवाई केली आहे. काल दिवसभरात 9 ठिकाणी असलेले हे बोर्ड काढून टाकण्यात आले आहे.
Pune PMC News : पुण्यात (Pune) अनेक ठिकाणी लागलेल्या 'आय लव्ह' (I Love Boards) बोर्डावर अखेर महापालिकेनं कारवाई केली आहे. काल दिवसभरात 9 ठिकाणी असलेले हे बोर्ड काढून टाकण्यात आले आहे. आय लव्ह पुणे, आय लव्ह हडपसर, आय लव्ह येरवडा, आय लव्ह बाणेर यासारख्या सुमारे 73 ठिकाणी 'आय लव्ह' विद्युत बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यातील फक्त 9 बोर्डांवर कारवाई केली आहे. हडपसर परिसरातील 6, सिंहगड रस्ता परिसरातील 3 बोर्ड काढून टाकण्यात आले आहेत. मात्र बाकी बोर्डांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई होत नाही आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
पुण्यात सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या “आय लव्ह… पुणे” या डिजिटल फलकांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिकेने (PMC) दिले होते. मागील काही वर्षात पुणे शहरात अनेक परिसरात 'आय लव्ह ...' चे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांबाबत अनेकांकडून तक्रारी आल्या होत्या या तक्रारींची दखल घेत अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या फलकावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हे बोर्ड पुण्याची बदनामी करत असल्याचं पालिकेचं मत होतं.
बोर्डाचा पैसा पाण्यात...
हा बोर्ड उभारण्यासाठी किमान दोन ते दहा लाखांपर्यंत खर्च येतो. या सगळ्या बोर्डांपैकी अनेक फलक पुणेकरांच्या निधीचा वापर करुन आणि नगरसेवकांची परवानगी न घेता लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे. सारसबाग, कात्रज, कोरेगाव पार्क, महंमदवाडी, स्वारगेट, वारजे, औंध आणि येरवडा या भागात हे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र या बोर्डांवर कारवाई केल्याने लाखो रुपये पाण्यात जाणार आहे.
बोर्डासाठी पुणेकरांच्या वीजेचा वापर
या बोर्डाबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी आहेत. नागरिक विविध ठिकाणी वारंवार या समस्या मांडत आहेत. प्रसारमाध्यमांनीही त्यांच्यावर अनेकदा बातम्या प्रसारित केल्या आहेत. यामुळे महापालिका आयुक्तांनी चौकशी करण्यास सांगितलं होतं. हे सर्व बोर्ड संबंधित विभागाची अनिवार्य परवानगी न घेता बसविण्यात आल्याचे आढळून आलं होतं. बोर्ड सार्वजनिक पुणेकरांची वीज वापरत असल्याचंदेखील आढळून आले होतं. अहवाल आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी अशा सर्व बोर्डांवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना कारवाई अहवाल आयुक्त कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार यांनी लेखी आदेश काढत दिली होती.