एकीकडे पवार कुटुंबाचं आज पुण्यात खलबतं, दुसरीकडे फडणवीस आणि राज्यपालही पुणे दौऱ्यावर
शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यातच आज पवार कुटुंब आज पुण्यात एकत्र येणार आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्यदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालही पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
मुंबई : शरद पवारांनी नातू पार्थ पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडींना भलताच वेग आला आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत सिल्वर ओक आणि वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठकांचं सत्र पार पडलं. तर आज पुण्यात पार्थ पवार आपल्या कुटुंबियांशी खलबतं करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही पुणे दौऱ्यावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता याला निव्वळ योगायोग म्हणायचं का हे येणारा काळच सांगेल.
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यात असणार आहेत. तसेच राज्यपाल पुण्याच्या विधानभवनात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस दुपारी 3 वाजता पत्रकार संघाच्या कोविड सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाला पुणे राजकीय हालचालींचं केंद्र होणार यात शंका नाही.
आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या पार्थ पवारांचे कान टोचल्यानंतर वडील अजित पवारांनी अजूनही सूचक मौन बाळगलं आहे. तरीही अजित पवार नाराज नसल्याचं राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर हा पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय असून यावर बोलणं योग्य नसल्याचं म्हणत विरोधक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र या संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भाजपमध्ये पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस-अजित पवार जोडीने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला राजभवनात पहाटेचा शपथथविधी उरकून राजकीय भूकंप केल्याचं सर्वश्रुत आहे. त्यामुळे आज पुण्यात असणाऱ्या या जोडीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.
आज बारामतीत पार्थ पवार कुटुंबियांशी चर्चा करुन काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर अजित पवार या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडणार का याबाबतही प्रतीक्षा आहे. अशात या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय भूकंप होणार का वादावर पडदा पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
संबंधित बातम्या
काका, आत्यांशी बोलून पार्थ पवार निर्णय घेणार!
आजोबांचा सल्ला आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल : सामना 'नया है वह', छगन भुजबळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं वर्णन 'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट 'पक्षाला अडचणीत आणणारे बेजबाबदार वागणे टाळावे', पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख शरद पवार यांचा पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष इशारा पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार