पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असून त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे."
दरम्यान शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं असलं तरी त्यांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचंही म्हटलं आहे.
पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा."
पार्थ पवारांची प्रतिक्रिया शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.
पार्थ यांच्या 'या' भूमिकांमुळे शरद पवार नाराज? - पार्थ पवार यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला शुभेच्छा पत्र - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट - पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात पुढाकार घेतल्याचा राजकीय आरोप - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय नाहीत
संबंधित बातम्या
'जय श्री राम' म्हणत पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणतात...
पार्थ पवार गृहमंत्र्यांच्या भेटीला; सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी
फोडाफोडीच्या राजकारणाला कोणाची फूस? पार्थ पवार यांचा पारनेर दौरा चर्चेत
Sharad Pawar | पार्थ पवार इममॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार