Pahalgam Attack: राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये, आम्ही मूर्तिमंत दहशतवाद पाहिलाय; संतोष जगदाळेंच्या पत्नीची आर्त विनंती
Pahalgam Attack: संतोष जगदाळेंच्या पत्नी राजकारण्यांना म्हणाल्या, पहलगामच्या घटनेचं राजकारण थांबवा. किमान माणुसकी म्हणून आमच्या भावनांशी खेळू नका. मृतांच्या कुटुंबीयांना मदत

Pahalgam Attack: दहशतवाद हा काय असतो, हे आम्ही डोळ्यांना पाहिलंय, अनुभवलंय आणि सोसलंय. दहशतवाद्यांचा द्वेष काय असतो, याचा अनुभव आम्ही घेतला. आम्ही त्यांच्यासमोर हात जोडलेत. त्यामुळे राजकारण्यांना कृपा करुन आमच्या भावनांशी खेळू नये. किमान माणुसकी म्हणून आणि आम्ही काय भोगलंय याचा विचार राजकारण्यांनी करावा, अशी विनंती पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे (Santosh Jagdale) यांच्या पत्नीने केली. त्या मंगळवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पहलगामच्या घटनेवरुन सुरु असणारे राजकारण थांबवण्याची विनंती केली. (Pahalgam Terror Attack)
आम्ही पहलगामला खूप भयंकर परिस्थिती अनुभवली आहे. आम्ही जे सांगतोय तेच लहान मुलांनी सांगितलं आहे. एक माणूस खोटं बोलतो, पण सगळे लोक खोटं बोलणार नाहीत ना? तरीही राजकारण अशी वक्तव्यं का करतात? हे करुन तुम्ही आमच्या मनाशी खेळत आहात. तुम्ही आमच्या राज्यातील नेते आहात, आम्ही तुम्हाला आपलं मानतो. त्यामुळे कृपया या सगळ्यावरुन राजकारण करु नका, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने म्हटले.
मी अजूनही त्याच धक्क्यात आहे. मी आठ दिवस झोपलेलीच नाही. मी डोळे बंद केले की, रायफलवाला माणूस डोळ्यांसमोर दिसतो. आम्हाला आज कोणता वार आहे, याचीही जाणीव नाही. आम्ही अजून पहलगामलाच आहोत, फायरिंगच्या घटनेतून आम्ही अजून बाहेर पडलेलो नाही. मला अजूनही भयंकर भीती वाटते. रात्री अडीच वाजता मी दचकून उठते. आपल्या आजुबाजूला कोणी रायफल घेऊन फिरतंय, असे मला वाटते. जरा कुठे आवाज झाला तर भीती वाटते. ही आमची मानसिक स्थिती आहे, असे जगदाळे यांनी म्हटले. आम्हाला लोकांचा खूप पाठिंबा मिळत आहे, ते आम्हाला येऊन भेटत आहेत. आमची हानी कधीच भरु शकत नाही. पण सरकार माझ्या मुलीचं काहीतरी चांगलं करेल, ही आशा आहे, असेही त्यांनी सांगितले.
हल्ल्याची भयानकता अजूनही आमच्या मनात घर करुन आहे: जगदाळे
आम्ही दहशतवाद काय असतो, याचा जिवंतपणी अनुभव घेतला आहे. आम्चा माणूस आमच्यासमोर मारला गेला. दहशतवाद्यांनी बोलून त्यांना ठार मारलं , ते तिथे लोकांना मारायलाच निवांतपणे आले होते. ते दृश्य भयानक होते. रायफल चालवणारा तो माणूस मी पाहिलाय. त्याने माझे मिस्टर आणि दीरांना गोळ्या कशा घातल्या, त्यांचा मेंदू कसा बाहेर आला, हे आम्ही बघितलंय. ती भयानकता अजूनही आमच्या मनात आहे, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने सांगितले.
आणखी वाचा























