Pune News : पुण्यातील चार रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत होणार विकास
चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन’ योजनेत समावेश आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे.
Pune News : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे (railway station ) या चार रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन’ योजनेत समावेश आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनचा समावेश असून या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून पुनर्विकासाचे भूमिपूजन पार पडलं.
रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने ‘अमृत भारत स्टेशन’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी 40 कोटी 35 लाख, तर आकुर्डी रेल्वे स्थानकासाठी 33 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
यामध्ये रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी- सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे काम होणार आहे.
अमृत भारत विकास योजनेतून पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वाठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरुळी, कडगाव, बारामती आणि फलटण या स्थानकांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन पार पडलं. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पीएम मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भूमिपूजन पार पडलं.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गेली अनेक दशके रेल्वे आपल्याला आपल्या आप्तांशी जोडण्याचे काम करत आहे, रेल्वेने देश जोडण्याचे काम केले आहे. आता रेल्वेला चांगली ओळख आणि आधुनिक वैशिष्ट्ये देणे ही आपली जबाबदारी आहे. नवीन संसद भवन, कर्तव्य पथ, युद्ध स्मारक आणि स्टेच्यू ऑफ युनिटी अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली. नकारात्मक राजकारणापासून दूर जाऊन, मतपेढीचे राजकारण आणि लांगुलचालन न करता, आम्ही देशाच्या विकासाचे काम एक मिशन म्हणून सुरु केले आणि त्याला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे.
लवकरच, रेल्वेमार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य पूर्ण होईल, त्यानंतर देशातील सर्व रेल्वेगाड्या वीजेवर चालतील, असं त्यांनी सांगितले. सौर पॅनल पासून निर्माण झालेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या स्थानकांची संख्या देखील गेल्या नऊ वर्षात 1200 पर्यंत पोहोचली आहे. नजीकच्या काळात, प्रत्येक रेल्वे स्थानकावरुन हरित ऊर्जा उत्पादन करण्याचेही सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज सुमारे 70,000 डब्यांमधे एलईडी दिवे लावण्यात आले असून, रेल्वेमधील जैव-शौचालयांची संख्या 2014 पासून, 28 पटींनी वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.सर्व अमृत स्थानके ही हरित इमारतींची मानके पूर्ण करणारी असतील असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.