Dr. Narendra Dabholkar : मोठी बातमी, नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी, सश्रम जन्मठेपेची शिक्षा
Dr. Narendra Dabhokar Murder Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Murder Case) यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल जाहीर केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलेलं आहे.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी आणि मॉर्निंग वाॅकला आलेल्या एका व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे अंदुरे आणि कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. 5 लाख रुपये दंड किंवा तो न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली होती. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयनं वीरेंद्र तावडे यांच्यावर केला होता. मात्र, वीरेंद्र तावडे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलं आहे.
फाशीची शिक्षेऐवजी जन्मठेप
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. सबळ पुराव्याअभावी तिघे जण निर्दोष सुटणं हे सीबीआयचं अपयश मानलं जातंय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं डॉ. हमीद दाभोलकर यांनी म्हटलं. या प्रकरणाच्या सूत्रधारांना अजून अटक झालेली नाही, या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं हमीद दाभोलकर यांनी म्हटलं.
मुक्ता दाभोलकर यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात आणि नालासोपारा येथे शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला त्या प्रकरणाच्या तपासातून या दोन आरोपींना पकडण्यात आलं होतं, असं म्हटलं. ज्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केलेला त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गानं जाऊन न्याय मिळतो, दृष्टिपथात येतो असं मुक्ता दाभोसकर यांनी म्हटलं. गोळीबार करणाऱ्यांना शिक्षा झाली याबाबत समाधानी आहोत. तिघे निर्दोष सुटले आहेत त्या निर्णयाबाबत आम्ही उच्च न्यायलयात जाऊ असं, मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या :