Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Pune News : पुण्यात लवकरच नानापर्व! अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. तर महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार? यावरून वाद सुरु असल्याचे चित्र आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुण्यात (Pune News) बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर दुसरी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री कोण असेल हे जाहीर करावं, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आता नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवे...
पुण्यात लवकरच नानापर्व! अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. "महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवे, असा मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी नाना पटोले यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलणार? याची चर्चा सुरू असतानाच ही बॅनरबाजी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आता मुख्यमंत्री होणारच, नाना पटोलेंचा दावा
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता भावी हे भावीच, राहतील असं वक्तव्य केले होते. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देताना सांगितले होते की, मला आमदार होऊ देत नव्हते, आमदार झालो. खासदार होऊ देत नव्हते, खासदार झालो. विधानसभा अध्यक्ष सुध्दा झालो. आता मुख्यमंत्री होणारच, असं वक्तव्य नाना पटोले यांनी काल केले होते. या पाठोपाठ आज नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री बॅनर झळकल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या