Pune NCP News: 90% खड्डे बुजल्याचा पुणे महापालिकेचा दावा खोटा; खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
शहरातील 90 टक्के खड्डे बुजवले, असा दावा केला मात्र हा दावा खोटा असल्याचं सांगत शहरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंंदोलन केलं आहे. स्वारगेट बस डेपो बाहेर हे आंदोलन करण्यात आलं.
Pune NCP News: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षांकडून खड्ड्यांविरोधात आंदोनल सुरु होती. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. शहरातील 90 टक्के खड्डे बुजवले, असा दावा केला मात्र हा दावा खोटा असल्याचं सांगत शहरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंंदोलन केलं आहे. स्वारगेट बस डेपो बाहेर हे आंदोलन करण्यात आलं.
मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन पुणे शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते द्यावे, अशी मागणी केली होती आणि जर आठवडाभरात पुणे खड्डेमुक्त झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं.
2017 ते 2022 या पाच वर्षात शहरात भाजपची सत्ता होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हे खड्डे बुजवले असते तर आज ही वेळ आली नसती. काही महिने महापालिकेत पालिका प्रशासन कामकाज बघत आहे. मात्र हे काम पालिका प्रशासनाचं नाही तर भाजपचं काम आहे. भाजपच्या 8 वर्षांच्या कालावधीत भ्रष्टाचार, ठेकेदार, आधिकारी आणि नगरसेवकांची युती झाली. त्याचाच परिणाम या शहरातील ख़ड्ड्यांवर झाला आहे. भाजपचा कारभार भ्रष्टाचारयुक्त होता, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे खड्डे आहेत. त्यामुळे आता भाजपमुक्त पुणे करावं, असं आवाहन पुण्याचे राष्ट्रवादी शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी पुणेकरांना केलं आहे. शहरातील 90 टक्के खड्डे बुजवले हा पालिकेचा दावा खोटा आहे, असंही ते म्हणाले.
रस्त्यांवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात प्लास्टिकचे मासे, खेकडे, कागदी जहाज सोडण्यात आले. खड्डे बुजवण्यात उशीर झाला तर खरे मासे या पाण्यात बघायला मिळणार आहे. वारंवार पुणेकरांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्नांबाबत सतर्क व्हा आणि लवकरात लवकर योग्य निर्णय घेत कामाला लागा, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.