Vasant More : 'मी फक्त उभा राहात नाही तर जमिनीवर खाली चांगली मांडी घालून बसतोही...'; वसंत मोरेंचा मनसे नेत्यांना टोला
मी फक्त उभा रहात नाही तर जमिनीवर खाली चांगली मांडी घालून बसतो ही...', असं कॅप्शन देत त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना टोला लगावला आहे.
Vasant More : मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी केलेल्या कामासंदर्भात माहिती देण्यासाठी आणि त्यांच्यावर झालेल्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी ते सोशल मीडियावर वापर करतात. नुकताच त्यांनी खाली मांडी घालून बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला 'मी फक्त उभा रहात नाही तर जमिनीवर खाली चांगली मांडी घालून बसतो ही...', असं कॅप्शन देत त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
पुण्यातील अशोक पर्व कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) बोलवण्यात आलं होतं. तो कार्यक्रम वसंत मोरेंना उभ्याने बघावा लागला होता. त्यावेळी पक्षाकडून त्यांना डावलल्या जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्या सगळ्या प्रसंगाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
नक्की काय झालं होतं?
प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक पर्व या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होता. त्यापूर्वी राज ठाकरेंचे पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होते. सगळे कार्यक्रम आटपून राज ठाकरे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पोहोचले. नाट्यगृहात जाण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या एका उपक्रमाचं नाट्यगृहाबाहेर उद्घाटन केलं. त्यानंतर ते नाट्यगृहात अशोक पर्व या कार्यक्रमासाठी गेले. राज ठाकरे या कार्यक्रमातील वक्ते असल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली. त्यासोबतच अनेक पुणेकरदेखील अशोकपर्व कार्यक्रम बघण्यासाठी हजर होते. त्यावेळी नाट्यगृहात मोठी गर्दी झाली होती. अनेक अशोक सराफांचे चाहते आणि राज ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेल्या लोकांना उभ्याने कार्यक्रम बघावा लागला. या सगळ्यांमध्ये मात्र वसंत मोरे यांना देखील कार्यक्रम उभ्याने बघावा लागला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना बसायला जागा दिली नव्हती.
राज ठाकरे कि स्थानिक नेते... कोण डावलतंय?
मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेले मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे यांना उभा राहून बघावा लागला. यामुळे राज ठाकरे त्यांना वारंवार डावलत आहेत का?, अशा चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र मनसेत काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरु आहे. स्थानिक नेत्यांमध्ये आणि वसंत मोरे यांच्यातले वाद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे वसंत मोरेंना राज ठाकरे डावलत आहेत की स्थानिक नेते डावलत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित बातमी-
Raj Thackeray Pune : राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर; मनसेतील अंतर्गत वाद सोडवणार का?