(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sextortion : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार Sextortion च्या जाळ्यात; काय आहे नेमकं प्रकरण?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांना एका सायबर भामट्याने सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
Sextortion : तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात (Sextortion) अडकवण्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत. यातून अनेकांनी पैसेदेखील उकळले आहे. मात्र आता सायबर भामट्यांनी थेट लोकप्रतिनिधींना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोहळचे आमदार यशवंत माने यांना सायबर भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. आमदार माने यांनी याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राजस्थानमधील आणखी एका टोळीचा पर्दाफाश करत रिजवान खान नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
आमदार यशवंत माने sextortion नेमकं प्रकरण काय आहे?
यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. ते पुण्यातील त्यांच्या घरी असताना जानेवारी महिन्यात माने यांच्या मोबाईल नंबरवर एक अश्लील मेसेज आला आणि अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्यांना देण्यात आली आणि एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
"मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ 70 ते 80 मेसेज करण्यात आले होते. एक लाख रुपयांची खंडणी माझ्याकडून मागितली होती यामुळे याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती," असं माने यांनी सांगितलं आहे. माने यांना ज्या नंबरवरून कॉल आला होता तो राजस्थानमधील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या जिल्ह्यात सात दिवसांसाठी तळ ठोकला आणि या आरोपीला पकडण्यात त्यांना यश आले. रिझवान खान असे आरोपीचे नाव असून त्याने आत्तापर्यंत 80 जणांना असे फोन केल्याच तपासातून निष्पन्न झाल आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
राजस्थानातील अनेक गावं सेक्सटॉर्शनचे अड्डे?
सध्या शहरात गुन्हेगारीच्या सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात सेक्सटॉर्शनच्या घटनांचादेखील समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील दोन तरुणांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणाची पुणे पोलिसांनी सखोल चौकशी केली होती आणि दोन्ही प्रकरणाच्या आरोपींना राजस्थानातून अटक केली होती. राजस्थानात गुरुगोठडी नावाचं गाव आहे. या गावातून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यावेळी हे गावच सेक्सटॉर्शनचा अड्डा असल्याचं समोर आलं होतं.
ही बातमी वाचा: