Pune News: दुर्दैवी! इमारत बांधकामाच्या बाजूच्या दुकानाची कोसळली भिंत; एकाचा मृत्यू
पुण्यात इमारतीच्या बांधकामाच्या जागेला लागून असलेल्या दुकानाची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पुण्यातील गणेश पेठेतील हमजेखान चौकात घडली.

Pune News: पुण्यात इमारतीच्या बांधकामाच्या जागेला लागून असलेल्या दुकानाची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पुण्यातील गणेश पेठेतील हमजेखान चौकात घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढले होते. अडकलेला व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर जखमी असल्याने काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
गेले तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत किमान 40 झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होत आहे. त्यातच गणेश पेठेत भिंत पडल्याने खळबळ उडाली आहे. गणेश पेठे हा पुण्यातील जुना परिसर आहे. या परिसरात अनेक ठिकाणी घराला-घरे लागून आहेत. त्यामुळे इमारत बांधत असलेल्या ठिकाणी जर मशीनीने काम सुरु असेल तर त्याचे हादरे परिसरातील बाकी जुने वाडे किंवा दुकांनांना बसतात. त्यामुळे अशा घटना घडतात. मात्र इमारत बांधणारे सगळे मजूर सुरक्षित आहेत.
पुण्यातील नाना पेठेतील मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. त्याचबरोबर सोमवार पेठेतील बोळे वाडा येथे पहिल्या मजल्यावरील घराचा काही भाग कोसळला आहे. दोन्ही अपघातात कोणतीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही आहे.
साधारण साडे-सातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कंट्रोलरुम मध्ये जीना कोसळल्याचा फोन आला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले. पुण्यतीसल जुने वाडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे वाडे धोकादायक झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हे वाडे सोडा, अशा प्रकारच्या नोटीसा पुणे महानगरपालिकेने नागरिकांना बजावल्या होत्या त्यानंतर पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागातील 38 हून अधिक अतिधोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. एक-दोन नाहीतर तब्बल 478 वाडे धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यावर पालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.























