Uday Samant Attack : बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी; हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरातांना पुणे पोलिसांकडून अटक
Uday Samant Attack : उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे हिंगोली संपर्क प्रमुख बबन थोरात यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बंडखोर आमदांराची गाडी फोडण्याचे आवाहन त्यांनी हिंगोलीत केले होते.
Uday Samant Attack : पुण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर धरपकड करत पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी देणारे हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी पाच जणांना अटक केली.
बबन थोरात यांना चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अटक
हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना मुंबईतून रात्रीच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केली. उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पुणे पोलिसांना हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईतील काळाचौकी पोलीसांनी बबन थोरात यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तोपर्यंत पुणे पोलिसांच पथक बबन थोरात यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत पोहचले होते. बबन थोरात यांना अटक करून पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
घटना काय?
शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची मंगळवारी कात्रजमध्ये 'शिवसंवाद' यात्रा आयोजित करण्यात आली होती. यासाठी हजारो शिवसैनिकांची गर्दी झाली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आधीच उदय सामंत हे मंदिरात जात असताना काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी गद्दार..गद्दारच्या ही घोषणा देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली.