Ravindra Dhangekar and Hemant Rasane : कसबा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच रासने अन् धंगेकर आमने-सामने; एकमेकांशी हात मिळवत म्हणाले...
Ravindra Dhangekar and Hemant Rasane : पुण्यातील कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने हे दोघेही निवडणुकीनंतर पहिल्य़ांदाच आमने सामने आले.
Ravindra Dhangekar and Hemant Rasane : पुण्यातील कसब्य़ाचे आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने हे दोघेही निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आमने सामने आले. खासदार गिरीष बापट यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राचं लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलं. याच कार्यक्रमासाठी दोघेही एकत्र आल्याचं बघायला मिळालं. यावेळी दोघेही हसत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोघांनी मिळून भित्तीचित्राचं लोकार्पण केलं आणि एकमेकांसोबत हातही मिळवला. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याने त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
रासने काय म्हणाले?
कसब्यातील पराभवानंतर हेमंत रासने हे पहिल्यांदाच रविंद्र धंगेकर यांना भेटले त्यावेळी ते म्हणाले की, "निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रतिस्पर्धी नसतो तर वेगवेगळ्या मतप्रवाहाचे उमेदवार असतो. केलेल्या कामासाठी आशीर्वाद मागत असतो. जनता दोघांनाही आशीर्वाद देते मात्र ज्याला जनता जास्त आशीर्वाद देते तो विजयी होतो आणि दुसरा उमेदवार त्याच्या पद्धतीने काम करतो", असं मत हेमंत रासने म्हणाले.
धंगेकरांनी मानले बापटांचे आभार...
मागील तीन दशकं गिरिश बापटांनी पुण्याचा विकास केला. राजकीय स्तर कसा ठेवावा? हे त्यांनी मला आणि हेमंत रासने यांना एकत्र आणून पुन्हा एकदा शिकवलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. बापटांनी काम करताना समाजाचा समतोल ठेऊन काम केलं आहे. त्यांच्या विरुद्ध मी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मी बापटांचा अभ्यास केला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. हेमंत रासने आणि मी मागील 15 वर्ष एकत्र काम करत आहोत, असंच काम करत राहू, असा विश्वास नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकरांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे (Congress) रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांच्यात तगडी लढत झाली. या निवडणुकीदरम्यान आणि प्रचारादरम्यान दोघांनीही एकमेकांवर जोरदार ताशेरे ओढले. दोघांनीही विजयाचा विश्वास दाखवला होता. मात्र त्यात रविंद्र धंगेकरांनी मोठ्या मताधिक्यानं बाजी मारत हेमंत रासने यांचा पराभव केला.
शिवजयंतीला भेट हुकली..
शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी दोघे एकाच मंचावर दिसणार होते. मात्र रविंद्र धंगेकरांना कार्यक्रमास्थळी यायला उशीर झाल्याने दोघांची भेट हुकली होती. त्यावेळी विधानसेभेतून शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी धंगेकरांनी होमग्राऊंड गाठलं होतं. विजयानंतर त्यांनी पहिल्यांदाच हेमंत रासने यांच्यावर भाष्य केलं होतं. आमच्यातील राजकारणाचं युद्ध संपलं असून आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालंय, आम्ही हातात हात घालून सोबत लढू, गेले पंधरा वर्ष आम्ही सभागृहात सोबत काम केले आहे, असं म्हणत त्यांनी त्यांनी महापालिकेतील सोबतीची आठवण करून दिली होती.