Lonavala Mahanagarpalika: लोणावळ्यातील फळविक्रेत्या महिलेचं 'भाग्य' उजळलं, अजितदादांच्या पक्षाकडून नगरपरिषदेचं तिकीट मिळालं, फळविक्री करत प्रचार सुरू
Lonavala Mahanagarpalika: फळ विक्रेत्या भाग्यश्री या स्वतःचं नशीब अजमवत आहेत. पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते आणि त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेवक होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करत आहेत.

लोणावळा: राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत. अशात लोणावळ्यात (Lonavala Mahanagarpalika) मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे, त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलं आहे. पण राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. (Lonavala Mahanagarpalika)
Lonavala Mahanagarpalika: सायंकाळी घरोघरी जाऊन प्रचार
गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागत आहे. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करत आहेत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत ही पोहचत आहेत. राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री या स्वतःचं नशीब अजमवत आहेत. पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते आणि त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेवक होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करत आहेत. (Lonavala Mahanagarpalika)
Lonavala Mahanagarpalika: सुनील शेळके यांनी आम्हाला संधी दिली
भाग्यश्री जगताप यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी मला एसटी कॅटेगिरी मधून हे तिकीट दिलेले आहे. त्यांनी दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू, सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत फळ विकते, आणि संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत प्रचार करते, तर त्यांचे पती महादेव जगताप यांनी सांगितलं की, आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता आम्ही राजकारणात उतरेल, आज सुनील शेळके यांनी आम्हाला संधी दिली या संधीचं आम्ही नक्की सोन करून दाखवू. तळागाळातील लोकांच्या समस्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू, आम्ही दुपारपर्यंत इथे काम करतो त्यानंतर संध्याकाळी दोन तीन महिला आणि आम्ही सर्वजण प्रचारासाठी जातो. (Lonavala Mahanagarpalika)
तर प्रचार करणे गरजेचे आहे आणि आपला उदरनिर्वाह देखील चालवणे गरजेचे आहे, दोन्ही मध्ये चांगले प्रयत्न करत राहायचे जे नशिबात आहे ते मिळेल असेही भाग्यश्री जगताप यांनी म्हटले आहे. पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते आणि त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेवक होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करत आहेत.























