एक्स्प्लोर
17 दिवसांपासून पुण्यातील कचराकोंडी कायम, नेते परदेश वारीवर

पुणे: गेल्या 17 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीमध्ये कचरा तसाच पडून आहे. जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे. या साठलेल्या कचऱ्यामुळं पुणेकरांच्या आरोग्याला धोकाही निर्माण झाला आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेश दौऱ्यावर गेले आहेत.
फुरसुंगीमध्ये कचरा टाकण्यास गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा न काढताच पालकमंत्री आणि महापौरांनी ऑस्ट्रेलिया आणि मॅक्सिकोला जाणं पसंत केलं.
कचऱ्याच्या प्रश्नावर ना फुरसुंगीवासीय मागे हटत आहेत, ना प्रशासन यावर कोणतं पाऊल उचलत आहे. या दोघांच्या संघर्षात सामान्य पुणेकराला मात्र कचऱ्यात राहावं लागत आहे.
दरम्यान, महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आजपासून आठ दिवस मॅक्सिकोला जाणार आहेत. तर पालकमंत्री गिरीष बापट हे 2 मे ते 11 मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न नेमका कसा निकाली निघणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















