(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पक्के पुणेकर! सोसायटीची भिंत विनापरवाना रंगवली; पुणेकरांनी पालिकेलाच पाठवलं लाखोंचं बिल
कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीने महापालिकेला 16 लाख रुपयांचे बिल पाठवले आहे. या प्रकरणाची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Pune News : पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. पुण्यात सर्वांना सारखे नियम असतात. त्यात प्रशासनाचे अधिकारी असो, महापालिका (pmc) असो किंवा सामान्य नागरिक असो. विनापरवाना काही केल्यास सामान्य नागरिकांवर योग्य ती कारवाई केली जाते. मात्र जर विनापरवाना नागरिकांच्या खाजगी जागेवर काही केलं तर त्या गोष्टीला पुणेकर अजिबात हलक्यात घेणार नाहीत. पुण्याच्या (kothrud) कोथरुड परिसरात असाच प्रत्यय आला आहे. सोसायटीचं वॉल कपाऊंड जाहिरातींसाठी बेकायदा रंगवली म्हणून कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीने महापालिकेला 16 लाख रुपयांचे बिल पाठवले आहे. या प्रकरणाची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
जी-20 च्या पार्श्वभूमीवर शहरात सगळीकडे रंगरंगोटी सुरु आहेत. शहरात सुशोभीकरण देखील केलं जात आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात स्वप्नशिल्प सोसायटी आहे. या सोसायटीच्या वॉल कपाऊंडवर महापालिका गेल्या पाच-सात वर्षांपासून जाहिराती रंगवते. शहरातील भिंतीवर विनापरवाना रंगरंगोटी केल्यास कारवाई करणार असल्याचं महापालिकेने यापूर्वी स्पष्ट केलं आहे. याच मुद्द्याची दखल घेत स्वप्नशील्प सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. महापालिका आपल्या सोसायटीच्या वॉल कपाऊंडवर गेली अनेक वर्षे विनापरवाना जाहिराती रंगवत असल्याबद्दल काही तरी केले पाहिजे, असं त्यांचं ठरलं. त्यानुसार सोसायटीचे अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी 22 डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र पाठविले.
सोसायटीची परवानगी न घेता महापालिका आमच्या सोसायटीच्या वॉल कपाऊंडचं रंगकाम करते. त्यामुळे आकाशचिन्ह विभागाच्या दरांनुसार महापालिकेने बिलापोटी 16 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली. त्यानुसार ते आयुक्तांना भेटले. आयुक्तांनी देखील या तक्रारीची दखल घेतली. त्यानंतर नरमलेल्या महापालिकेने वॉल कपाऊंड पूर्ववत करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आणि आपली चूकही कबूल केली.
पालिकेनं चूक मान्य केली
पुण्यात अनेक परिसरात विनापरवाना रंगरंगोटी केली किंवा बॅनर लावले तर पालिका लगेच कारवाई करते. अशा कारवाया आतापर्यंत अनेकदा केल्या आहेत. शिवाय आकाश चिन्ह विभागाकडून रुफ टॉप हॉटेवरही अनेकदा कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र यावेळी पुणेकरांनी पालिकेलाच कैचीत पकडलं आहे. पालिकेनेच विनापरवाना रंगरंगोटी केल्याने पालिकेलाच दंड मागितला आहे. शिवाय या संदर्भातील पालिकेने पाहणी केली. माहिती गोळा केली आणि चूक कळल्यावर पालिकेने चूक मान्यही केली आणि पूर्ववत करु देणार असल्याचं सोसायटीच्या नागरिकांना सांगितलं. या प्रकरणाची सध्या पालिकेत आणि शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.