Ravindra Dhangekar : 28 वर्षांनी इतिहास रचला, कसब्यात भाजपच्या गडाला खिंडार; कोण आहेत रवींद्र धंगेकर?
कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला आहे.
Ravindra Dhangekar : कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला आहे. कसब्यात यंदा भाजप आणि मविआमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. "जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपला 40 स्टार प्रचारकांची फौज पाठवावी लागली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी उतरावं लागलं होतं. त्याचवेळी मी निवडणूक जिंकलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा जनतेचा विजय आहे," असंही ते म्हणाले.
Pune Kasba By-election Results 2023 Live : कोण आहेत रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर हे भाजपचे हेमंत रासणे यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. प्रदीर्घ काळापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्याकडे तगडे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला होता. धंगेकर तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विश्वासू राहिले आहेत. रविंद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. मनसेमध्ये असताना धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू होते.
Pune Kasba By-election Results 2023 Live : सर्वसामान्यांचा नेता
रविंद्र धंगेकर हे कसब्यात मागील 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यामुळे जनतेचा कायम त्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यासोबतच ते सामान्यांचे नेते आहेत. रात्रीबेरात्री नागरिकांच्या कामाला धावून जातात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामन्यांपासून उच्चभ्रू लोकापर्यंत ते सगळ्यांचे लाडके नेते आहे. त्यांच्या या कामामुळे मतमोजणी सुरु झाल्यापासून ते आघाडीवर होते.
Pune Kasba By-election Results 2023 Live : धंगेकरांनी राखला भाजपचा गड
कसबा पेठेतील भाजपचं वर्चस्व असलेल्या सदाशिव पेठे, नारायण पेठ आणि शनिवार पेठेत जनतेचे भाजपला डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भागातही धंगेकरांनाच जास्त मतं मिळाली आहे. हेमंत रासने यांनी या सगळ्या परिसरात कायम काम केलं आहे. तिथल्या मतदारांचा त्यांना पाठिंबा असतो. मात्र त्याच भागात जनतेने भाजपला पाठिंबा न दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपचा गड धंगेकर यांनी राखला आहे.