दंगल घडवण्यासाठी अयोध्येचा मुद्दा पुढे : प्रकाश आंबेडकर
सध्याच्या सरकारकडे दोनच मुद्दे आहेत. अयोध्येच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम दंगल आणि भारत -पाकिस्तान युद्ध. या सरकारकडे परराष्ट्र धोरण नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पुणे : संविधान दिनानिमित्त पुण्यातील एआयएसएसएमएस ग्राउंडवर बहुजन वंचित आघाडीची भव्य सभा झाली. या सभेत बोलताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपवर टीका केली. दंगल घडवण्यासाठी हा मुद्दा उचलल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.
सध्या अयोध्येचा मुद्दा देशात चर्चेत आहे. या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "दंगल घडवून आणण्यासाठी अयोध्येचा मुद्दा समोर आणला आहे. अयोध्येच्या मुद्द्यावरुन दंगल होणार हे नक्की आहे. त्यामुळे दंगल होणार नाही यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे."
"सध्याचं सरकार चवताळलेलं आहे. वातावरण निर्मिती करुन मंदिर उभं राहणार नाही. मंदिरासाठी नाही तर दंगलीसाठी हा माहोल उभा केला जात आहे. यांचं राजकारण दंगलीशिवाय पूर्ण होत नाही", असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
सध्याच्या सरकारकडे दोनच मुद्दे आहेत. अयोध्येच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम दंगल आणि भारत -पाकिस्तान युद्ध, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस-राष्ट्रवादीवरही यावेळी निशाणा साधला. आघाडीच्या चर्चेसाठी उघडपणे कुणी समोर येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच चर्चेसाठी कुणी पुढे आले नाही, तर आम्ही संपूर्ण सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी 'अब की बार, आंबेडकर सरकार' असा नारा इम्तियाज जलील यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी प्रोजेक्ट केलं. तसेच आत्तापर्यंत जे जे विकास विकास बोलत होते त्यांनी निवडणूक येताच मंदिराचा मुद्दा धरला, अशी टीकाही त्यांनी शिवसेना-भाजपवर केली.
बहुजन वंचीत आघाडीत सामिल झालेले अनेक जातींचे नेते, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि माजी आमदार लक्ष्मण माने यावेळी उपस्थित होते.