(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून महिला डॉक्टरची तलाठी पतीकडून हत्या, गृहप्रवेश ठरला अखेरचा दिवस
डॉ. सरला साळवे नायडू हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यांपासून त्या काम करत होत्या. तसेच मोशीत खाजगी रुग्णालय देखील चालवत होत्या. तर आरोपी तलाठी विजयकुमार साळवे हा पुण्याच्या जुन्नर तालुक्यात कार्यरत आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये तलाठी पती आणि डॉक्टर पत्नीने 4 सप्टेंबरला नववास्तूत गृहप्रवेश केला. पण या आनंदाच्या दिवशी पती तिच्या सोबत नेमकं काय करणार आहे, याची पुसटशी कल्पनाही पत्नीला नव्हती. दोन दिवसांनी जेव्हा या घरात पोलिसांनी प्रवेश केला तेव्हा सर्वानाच धक्का बसला. कारण डॉक्टर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ही हत्या तिच्या तलाठी पतीने केल्याचा पुरावा देखील हाती लागला होता.
तलाठी पती आणि डॉक्टर पत्नी या दाम्पत्याने मोशीत नववास्तू घेतली होती. चार सप्टेंबरला या वास्तूत त्यांनी गृहप्रवेश केला. दिवस आनंदाचा होता. पै-पाहुणे, मित्र मंडळी त्यांना शुभेच्छा द्यायलाही पोहचले. पतीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, पण मनात त्याचे वेगळेच विचार सुरू होते. डॉक्टर पत्नीला त्या विचारांची पुसटशी कल्पना देखील नव्हती. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आटोपला अन तलाठी पतीने पत्नीची हत्या करण्याची तयारी सुरू केली.
गृहप्रवेशाच्याच रात्री त्याने डॉक्टर पत्नीची हत्या केली अन पती तिथून पसार झाला. दुसऱ्या दिवसापासून हे दाम्पत्य कोणाच्याच संपर्कात नव्हतं. म्हणून शेवटी मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधला. भोसरी एमआयडीसी पोलीस मोशीतील युटोपीया सोसायटीत पोहचले. नवव्या मजल्यावरील त्यांचं घर बंद होतं. मग पोलिसांनी डुप्लिकेट चावी बनवून घेतली अन घराचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. मृतदेहाशेजारी लोखंडी हातोडा आणि चाकू सापडला. त्याशिवाय एक चिट्ठी होती. याच चिट्ठीमध्ये तलाठी पतीने ही हत्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून केल्याचं नमूद केलं होतं. ही हत्या करून तो पसार झालेला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली.
तलाठी पती हा मूळचा गोंदियाचा आणि डॉक्टर पत्नी भंडाऱ्याची आहे. दोन वर्षांपूर्वी ते विवाहबंधनात अडकले. पत्नीचं बीएएमएसचं शिक्षण झालेलं. त्या एक खाजगी रुग्णालय चालवायच्या, शिवाय पुण्यातील नायडू रुग्णालयात त्या नुकत्याच कामाला लागल्या होत्या. तर तलाठी पती हा पुण्याच्या जुन्नर तालुक्यात कार्यरत आहे. त्यांच्या या सुखी संसारात संशयाचा खडा पडला. नायडू हॉस्पिटलमधील एका डॉक्टरशी तिचे प्रेमसंबंध असल्याचा तलाठी पतीला संशय आला अन अख्खा संसार संपुष्टात आला.
पत्नीची हत्या करून संसार संपविलेला तलाठी शेवटी पुण्यातील आळेफाट्याला निदर्शनास आला. तेथील त्याच्या घराजवळ त्याने त्याची चारचाकी पार्क केली आणि एक बॅग घेऊन तो निघून गेल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. लवकरच तो पोलिसांच्या हाती लागेल. पण सुशिक्षित ते ही उच्चपदस्थ व्यक्ती असा कायदा हातात घेत असतील तर हे नक्कीच धोक्याचं आहे.
इतर बातम्या