पुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पुणे - सोलापुर महामार्गावर असलेल्या या उरळी कांचनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी तिथं तळ ठोकून आहेत.
पुणे : पुण्यापासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उरळी कांचन परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी झाल्याने बाजारपेठेत मोठमोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.
उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करुन देण्यात आली. त्यामुळे या गावांमधून उरळी कांचनला जाणाऱ्या ओढ्याला पुर आला. या पुरामुळे ओढ्याच्या काठावरील अवैध बांधकामं आणि अतिक्रमणांना मोठा फटका बसला. अनेक घरांमध्य पाणी शिरलं. पुढं हे पाणी उरळी कांचनमधे घुसलं आणि संपूर्ण शहरात पसरलं.
शिंदवणे गावात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसामुळे घरांची पडझड झाली आहेच पण शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्याच्या वेगात वाहून आलेल्या मातीमुळे इथल्या विहिरी बुजल्या आहेत. कालची संपूर्ण रात्र ग्रामस्थांनी जागून काढली. अजूनही त्यांच्या घरात, शेतात पाणी आहे. हाताशी आलेली पिकं तर गेलीच पण राहायचे घरही उद्ध्वस्त झाले अशी वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे.
पुणे - सोलापुर महामार्गावर असलेल्या या उरळी कांचनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी तिथं तळ ठोकून आहेत. गेल्याच आठवड्यात पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले होते.